कल्याण : नक्षली संघटनेतील 7 संशयित एटीएसच्या ताब्यात, भीमा-कोरेगाव-महाराष्ट्र बंदमध्ये हात असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 08:16 PM2018-01-13T20:16:38+5:302018-01-13T20:49:41+5:30
नक्षली संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतले आहे.
कल्याण : नक्षली संघटनेतील 7 संशयितांना एटीएसनं ताब्यात घेतले आहे. हे 7 जण जण सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या या 7 जणांचा कोरेगाव-भीमा हिंसाचार व महाराष्ट्र बंदमध्ये हात असल्याचा संशयदेखील व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्वांकडे आक्षेपार्ह लिटरेचर तसेच बॅनर आढळून आले आहेत. कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी राज्यात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या आणि सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान करण्यात आलं होतं. खासगी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती. या सर्व घटनांमध्ये या संघटनेचा किंवा या सात जणांचा हात होता का?, याचा तपास आता एटीएसकडून केला जात आहे.
#Mumbai Maharashtra ATS arrested 7 people working for organisation called CPI(Maoist) which is banned under the Unlawful Activities (Prevention) Act, 1967 (UAPA); Accused remanded to police custody till 16th Jan, further investigation on.
— ANI (@ANI) January 13, 2018
कल्याण स्टेशनला हे संशयित येत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. एटीएसने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नाही. सविस्तर चौकशीनंतर या संशयिताने सर्व बाबींचा खुलासा केला.
कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि विक्रोळी भागात राहणारे आपले सहकारी सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याचं या संशयिताने सांगितलं. त्यानंतर एटीएसने सर्व ठिकाणी शोध घेत एकूण सात जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे सीपीआय (माओ) या संघटनेशी संबंधित कागदपत्रंही मिळाली आहेत.
नेमकी काय आहे भीमा-कोरेगाव घटना ?
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.
सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.
सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.
दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले.