कल्याण : राष्ट्रवादीचा हल्लाबोल अन् जनआक्रोश, महागाईचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:58 AM2017-10-13T01:58:38+5:302017-10-13T01:58:40+5:30
शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, भरमसाट वाढलेली महागाई आणि ऐन दिवाळीत लादण्यात आलेल्या वीजभारनियमनाच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी
कल्याण : शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, भरमसाट वाढलेली महागाई आणि ऐन दिवाळीत लादण्यात आलेल्या वीजभारनियमनाच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी आक्रोश आणि हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. कल्याण तहसील कार्यालय आणि ‘महावितरण’च्या तेजश्री मुख्यालयावर या वेळी निदर्शने करण्यात आली. त्यात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रारंभी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११.३० च्या सुमारास येथील पश्चिमेकडील शिवाजी चौकात सुरू झालेला मोर्चा महंमद अली चौक, नेहरू चौक, रेल्वे स्थानक रोडमार्गे तहसीलवर धडकला. यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कार्याध्यक्ष विलास म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक जे.सी. कटारिया, नंदू धुळे, उमेश बोरगावकर, श्याम आवारे, राजेंद्र नांदोस्कर, मनीषा बाळसराफ, रेखा सोनवणे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजपा व शिवसेना सरकारच्या राजवटीत शेतकºयांची फसवी कर्जमाफी व भरमसाट वाढलेली महागाई, याबाबत या वेळी रोष व्यक्त करण्यात आला. सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांना निवेदन दिले. सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया आॅनलाइन करत आणखी क्लिष्ट व किचकट केली. दिवाळीपूर्वी कर्जमाफी करू, असे आश्वासन देणारे सरकारनंतर शेतकºयांनी आता कर्ज भरावेत, नंतर सरकार माफ करेल, असेही म्हणायला लागले आहे, याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले.
त्यानंतर, मोर्चा ‘महावितरण’च्या तेजश्री मुख्यालयाकडे वळवण्यात आला. महात्मा फुले चौक, सुभाष चौक, मुरबाड रोड, शासकीय विश्रामगृह, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून तो कर्णिक रोडवरील तेजश्री कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावरच तेथील सुरक्षारक्षकांनी रोखले. तेथेही केंद्र सरकारच्या निषेधार्थ आक्रोश करण्यात आला. काहीवेळाने शिष्टमंडळाला कार्यालयात सोडण्यात आले. या वेळी शहरी आणि ग्रामीण भागातील अभियंत्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली. आमच्या मागण्यांची गंभीर दखल घ्या, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा देण्यात आला. अधिकाºयांना पदाधिकाºयांनी निवेदन सादर केले.