भाजप-शिवसेनेच्या युतीवर कलानींचा प्रवेश अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:46 AM2019-08-02T00:46:24+5:302019-08-02T00:46:30+5:30
शिवसेनेचा पर्याय खुला : आमदार ज्योती कलानी यांना भाजपची नकारघंटा
सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपवर कलानींचा शिक्का बसू नये आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी विचारात घेता, आमदार ज्योती कलानी यांच्या प्रवेशाला भाजपने नकार दिल्याची चर्चा शहरात रंगली. मात्र, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कलानी कुटुंब भाजपमय झालेले दिसेल, असा दावा कलानी समर्थकांनी केल्याने, कलानींच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
उल्हासनगरात कलानी कुटुंबाचे राजकीय अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आमदार ज्योती कलानी, त्यांचा मुलगा ओमी कलानी आणि सून महापौर पंचम कलानी हे त्यांच्या गोटातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून शहरात रंगली आहे. गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असलेल्या कलानी कुटुंबाचा भाजपप्रवेश निश्चित समजला जात असला तरी, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले नाही. शिवसेना-भाजपची युती झाल्यास पक्षाचा उमेदवार कलानी कुटुंबाच्या समर्थनाशिवाय निवडून येतो. पक्षाच्या वरिष्ठांना स्थानिक नेत्यांनी तशी माहिती दिली आहे. मात्र, युती न झाल्यास कलानी कुटुंबाचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.
भाजप-शिवसेनेच्या युतीवर कलानी कुटुंबाचा प्रवेश अवलंबून असून, ज्योती कलानी यांच्या प्रवेशास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नकार दिल्याची चर्चा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.पप्पू कलानी याच्या जन्मठेपेच्या शिक्षेत सूट व कुटुंबाचे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी ओमी टीमची स्थापना केली. त्यानंतर, भाजपने ओमी टीमसोबत आघाडी करून महापालिकेची सत्ता हस्तगत केली. ओमी कलानी यांची पत्नी पंचम या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर महापौरपदी विराजमान झाल्या.
राष्ट्रवादी संपल्यात जमा
ज्योती कलानी भाजपमध्ये गेल्यास शहरातील राष्ट्रवादीची ताकद संपून, हा पक्ष केवळ काही वॉर्डांपुरता मर्यादित राहणार आहे. कलानी कुटुंबाला आमदारकीची उमेदवारी मिळाल्यास आपले अस्तित्वच राहणार नसल्याची भीती भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाºयांना सतावत असून, यातून ऐन निवडणुकीत पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून, कलानी कुटुंबाला विरोध करून स्वबळावर भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची रणनीती स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांनी आखल्याचेही बोलले जात आहे.
युती न झाल्यास सेनेची उमेदवारी
च्विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती न झाल्यास आणि कलानी कुटुंब भाजपमय न झाल्यास, शिवसेनेच्या तिकिटावर कलानी कुटुंबापैकी एकजण उमेदवार असू शकेल, अशीही चर्चा शहरात सुरू आहे.
च्प्रत्यक्षात कलानी कुटुंब मात्र भाजप प्रवेशासाठी उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता युती होते अथवा नाही, झालीच तर कलानी कुटुंबाला प्रवेश मिळतो की नाही आणि त्याहीपेक्षा ज्योती कलानी, ओमी व पंचम यांच्यापैकी कोणाला आमदारकीचे तिकीट मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.