डोंबिवली : गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा कसा करावा, यासंदर्भात केडीएमसीने कोणत्याही मार्गदर्शक सूचना अथवा धोरण जाहीर केलेले नाही. गणेश विसर्जन तलावांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने या तलावांना डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठाकुर्लीतील चोळेगाव गणेश विसर्जन तलावाची सद्य:स्थिती पाहता हे चित्र दिसून येते. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते, परंतु तलावाच्या स्वच्छतेबाबत केलेल्या पत्रांकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे.
केडीएमसीच्या हद्दीत ४२ तलाव आहेत. काळातलावाचा अपवाद वगळता कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश तलावांची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी विसर्जनाला मनाई केली असली तरी जेथे मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन होते, अशा ठिकाणच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. चोळेगाव परिसरातील तलाव तर निर्माल्य टाकण्याचे हक्काचे ठिकाण झाले आहे. मनाई असतानाही हे प्रकार सुरूच आहेत. तलावाच्या बाजूला कचराही सर्रासपणे टाकला जात आहे. यामुळे या तलावाला एकप्रकारे अवकळा आली आहे.
तलावाची स्वच्छता राखावी, यासाठी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केले आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाशी संबंधित कामात यंत्रणा व्यस्त असल्याचे कारण त्यांना दिले जात आहे. मात्र, आता गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने तलावाची स्वच्छता महत्त्वाची असून, त्यासाठी प्रशासनाकडून तातडीने स्वच्छता होणे गरजेचे असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारकडून गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही सूचना दिल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले.
लवकरच कार्यवाही सुरू होईल
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारने ज्या सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणेच कार्यवाही होणार आहे. कोरोनामुळे यंत्रणा व्यस्त आहे. परंतु, लवकरच विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे काम सुरू केले जाणार आहे.-सपना कोळी-देवनपल्ली, शहर अभियंता, केडीएमसी