कल्याण : केडीएमसीच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात शनिवारी झालेल्या ‘सही रे सही’ नाट्यप्रयोगाच्या वेळी रंगमंचावरील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने कलाकार उकाड्याने हैराण झाले. अभिनेता भरत जाधव यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नाट्यनिर्माते व कलावंतांनी याआधीही वारंवार नाराजी व्यक्त करून काहीही फरक न पडल्याचे यातून दिसून आले.१४ एप्रिल २०१६ ला ‘ती फुलराणी’ या नाट्यप्रयोगादरम्यान कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने हैराण झालेल्या प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घालत पैसे परत देण्याची मागणी केली. तासाभराच्या गोंधळानंतर नाटकाचा दुसरा अंक झाला. पण नाट्यगृह व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे अत्रे रंगमंदिराच्या देखभालीचे काम करत एप्रिलपासून ते नाट्यगृह बंद आहे.आता हा प्रयोग डोंबिवलीतील फुले कलामंदिरातही सुरू झाला आहे. गेल्या महिन्यातही ‘के दिल अभी भरा नही’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी ही यंत्रणा बंद पडली होती. तेव्हा लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती. रंगमंचावरील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने क ला सादर करताना त्रास झाला. आमच्या अभिनयात कुठे कमतरता राहिली असेल, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत कलाकारांनी रसिकप्रेक्षकांची माफी मागितली होती. पुन्हा शनिवारी ‘सही रे सही’ या नाट्यप्रयोगावेळी एसी बंद पडले. त्याचा त्रास कलाकारांना विशेषत: भरत जाधव यांना झाल्याने त्यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहिले आहे. दीड वर्षापासून येथील या यंत्रणेचा बिघाड सुरू आहे. फुले कलामंदिरात १२ वातानुकूलन यंत्रे आहेत. त्यातील आठ यंत्रांचे कॉम्प्रेसर निकामी आहेत. त्यामुळे कधी प्रेक्षक गॅलरी, तर कधी रंगमंचावरचे एसी सुरू असतात. जाधव यांनी या दुरवस्थेबाबत शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याशीही चर्चा केली.फेब्रुवारीत झालेल्या साहित्य संमेलनापूर्वीही फुले कलामंदिराची दुरवस्था चव्हाट्यावर आली होती. कलावंत सुमित राघवन यांनीही नाट्यगृहातील व्हीआयपी रूमच्या दुरवस्थेचा व्हिडीओ टाकला होता.अनुचित प्रकार घडला, तर जबाबदार कोण?भरत जाधव यांनी व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात रंगमंचावरची वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यात कला सादर करताना कलाकारांना त्रास झाल्याचे म्हटले आहे. अशा अवस्थेत काही अनुचित प्रकार घडला, तर याला जबाबदार कोण, असाही सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे लवकरच या दुरवस्थेवर ठोस कार्यवाही करावी, अशी विनंती जाधव यांनी केली आहे.यंत्रणेच्या बिघाडाबाबत पाठपुरावा सुरूवातानुकूलित यंत्रणा बिघडली आहे, हे वास्तव आहे. याबाबत, वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनी दिली, तर विद्युत विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुºहेकर यांनीही पर्यायी व्यवस्था केली असून निविदा प्रक्रियाही सुरू आहे. चांगली सेवा देता येईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
केडीएमसीची नाट्यगृहेही ‘सही रे सही’!, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड , भरत जाधव यांची तीव्र नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 6:38 AM