कोळी गीते-नृत्यांनी ठाण्यातील कोळी महोत्सवात आणली रंगत, पुष्पा पागधरेंनीही सादर केली गाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:49 PM2017-12-26T15:49:48+5:302017-12-26T15:51:50+5:30
दरवर्षीप्रमाणे याही वर्ष जोशात आणि उत्साहात गावकीचा कोळी महोत्सव संपन्न झाला. यावेळी हजारो नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिली.
ठाणे: खाद्य पदार्थांच्या मेजवानी बरोबर नृत्य, गायन, वादन, प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी ठाणे पुर्व येथील एक दिवसीय कोळी महोत्सव हजारो ठाणेकरांच्या उपस्थितीत रंगला. यावेळी २६ व्या गानरत्न - भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी, ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरेंच्या गाण्यांनी कोळी महोत्सवाची रंगत द्विगुणीत केली.
चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच, ठाणे (पूर्व) तर्फे गावकीचा वार्षिक १५ वा कोळी महोत्सव घाटावर (कस्टम जेट्टी) आयोजित करण्यात आला होता. पागधरे यांनी महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर रमेश नाखवा व आशिष मोरेकर यांच्या साथीने पेश केलेल्या ठसकेदार कोळी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सवाचे उद्घाटन प्रमिला ठाणेकर, मेघनाथ कोळी, रजनी कोळी, भागीरथी कोळी या ज्येष्ठ प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दहा जणांचा सत्कार करण्यात आला. या दहा सत्कारमूर्तीच्या वतीने गजाननराव कोळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी सत्काराला उत्तर दिले. सनईचा सूर (तुकाराम कोळी), ठाणा कोळीवाडा (विजय ठाणेकर), गोमू माहेरला जाते (आशिष मोरेकर), धनगराची (नूतन ठाणेकर), तुझे नादान गो (सोनाली ठाणेकर) यांच्या गीतांनी तर साई श्रद्धा, दायकाशी, श्री आनंद भारती समाज, दर्याचा दरारा १० के, नॉटी बॉईज या नृत्य पथकांनी कार्यक्र माची शोभा वाढवली. प्रज्ञा भगत यांचे लावणी नृत्य अप्रतिम झाले. कोळी हंगाम्याने महोत्सवाची सांगता झाली. प्रमोद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले. पारंपारिक वेशात भव्य शोभा यात्रा, कोळी व लोककलेवर आधारीत गीते, नृत्य आणि नाट्य यांचा रंगतदार कार्यक्रम, कोळी कलाकारांचे हस्त, चित्र व कला यांचे दालन, कोळी लोकजीवन, इतिहास, चळवळ यांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे आकर्षण होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तब्बल पाच हजार नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आयोजक विक्रांत कोळी यांनी सांगितले.