कोपर उड्डाणपूल आजपासून होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:53 AM2019-09-15T00:53:58+5:302019-09-15T00:54:52+5:30
कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो रविवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. त्यामुळे शहरातील सर्व वाहतूक अरुंद असलेल्या ठाकुर्ली पुलावरूनच वळवण्यात येणार आहे. दरम्यान, कोपरपूल डागडुजीसाठी किती काळ बंद राहील, याबाबत मात्र नेमकी माहिती महापालिका, रेल्वे प्रशासन देऊ शकलेले नाही. पुलाची डागडुजी करावी की, तो पाडून नवीन बांधावा, हे देखील आताच सांगता येणार नसल्याने किमान वर्षभर डोंबिवलीकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.
कोपरपुलावरून वाहतूक बंद करावी, असे पत्र केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी शुक्रवारी काळे यांना दिले होते. त्यानुसार, त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
पूल बंद झाल्यानंतर महापालिकेने नेमलेल्या रॅनकॉन कन्सल्टंटकडून पुलाची पाहणी करण्यात येणार आहे. जमिनीच्या चाचणीचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. मात्र, रेल्वेची वाहतूक दिवसा दोन तास बंद असेल, तरच पुलाच्या खालच्या भागातील स्लॅबची क्षमता तपासणे शक्य होणार आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. रेल्वेकडून त्यासाठी ट्रॅफिक ब्लॉक मिळणे आवश्यक आहे. पुलाची तपासणी झाल्यानंतर डागडुजीचा अहवाल मिळण्यासाठी आठवडा लागणार आहे. परंतु, रेल्वेने त्यांच्या अखत्यारित येणारे लोखंडी खांब व त्यांचे आयुष्यमान यासंदर्भात आयआयटीकडून तपासणी केली होती. मात्र, त्याचा अहवाल रेल्वेकडून मिळू शकलेला नाही. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.