गौरी हॉलमधील कोविड सेंटर केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:07+5:302021-06-28T04:27:07+5:30
बदलापूर : बदलापूर पालिकेने आपल्या शहरातील रुग्णांसाठी गौरी हॉल आणि जान्हवी हॉल हे दोन खाजगी हॉल ताब्यात घेऊन त्या ...
बदलापूर : बदलापूर पालिकेने आपल्या शहरातील रुग्णांसाठी गौरी हॉल आणि जान्हवी हॉल हे दोन खाजगी हॉल ताब्यात घेऊन त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू केले होते. या दोन हॉलपैकी गौरी हॉलला पुराचा धोका बसण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणचे कोविड सेंटर बंद करण्यात आले असून, ते सेंटर आता पेंडुरकर हॉलमध्ये सुरू करण्यात आले आहे.
बदलापूर नगरपालिकेच्या वतीने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी सोनिवली येथील बीएसयूपीच्या घरांमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्यानंतर ऑक्सिजन आणि आयसीयू बेड असलेली यंत्रणा गौरी हॉल येथे उभारली होती. त्या ठिकाणची यंत्रणा कमी पडत असल्याने पुन्हा नव्याने जान्हवी हॉलमध्येही ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गौरी हॉल आणि जान्हवी हॉल यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. मात्र, गौरी हॉल हे उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असल्याने त्या ठिकाणी पुराचा धोका असतो. हे लक्षात घेऊन बदलापूर पालिकेने पावसाळ्यापूर्वी गौरी हॉल येथील कोविड केअर सेंटर बंद केले आहे. आजच्या घडीला बदलापूर पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये शंभर रुग्ण उपचार घेत असून, त्यातील ३१ रुग्ण हे सोनिवलीच्या कोविड केअर सेंटरमध्ये, २७ रुग्ण जान्हवी हॉलमध्ये आणि ३७ रुग्ण हे पेंडुरकर हॉलमध्ये उपचार घेत आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असल्याने बदलापूर पालिकेने कर्मचाऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी केली आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तब्बल २१ हजार रुग्णांवर कोरोनाचे संकट ओढवले होते. त्यातील २० हजार ५१५ रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.