उत्साह-दिमाखात रंगली कौपिनेश्वर स्वागतयात्रा

By admin | Published: April 9, 2016 02:18 AM2016-04-09T02:18:55+5:302016-04-09T02:18:55+5:30

रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलताशांचा गजर, भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले ठाणेकर, मित्रमैत्रिणींसोबत सेल्फीचा आनंद लुटणाऱ्या तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

Kupineshwar welcome card | उत्साह-दिमाखात रंगली कौपिनेश्वर स्वागतयात्रा

उत्साह-दिमाखात रंगली कौपिनेश्वर स्वागतयात्रा

Next

ठाणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलताशांचा गजर, भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले ठाणेकर, मित्रमैत्रिणींसोबत सेल्फीचा आनंद लुटणाऱ्या तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध चित्ररथांच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी हेच जीवन, जल है तो कल है... अशा घोषवाक्यांतून केलेली जनजागृती असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले ते शुक्रवारी ठाण्यातील कौपिनेश्वरच्या नववर्ष स्वागतयात्रेत... ‘शांताबाई..., आवाज वाढव डीजे..., पिंगा गं पोरी पिंगा...’ अशा एकापेक्षा एक हिट गाण्यांवर अंगणवाडीसेविकांनी जल्लोषात सादर केलेल्या नृत्याने यंदाच्या स्वागतयात्रेत वेगळीच रंगत आणली.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने निघालेल्या स्वागतयात्रेचे यंदाचे १५ वे वर्ष होते. पहाटे कौपिनेश्वराची विधिवत पूजा केल्यानंतर मासुंदा तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुहास बाकरे हे स्वागताध्यक्षपदी होते. जांभळीनाका येथील रंगो बापूजी गुप्ते चौकात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी खासदार राजन विचारे, नगरसेवक रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, न्यासाचे अध्यक्ष मा.य. गोखले, विश्वस्त सुधाकर वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. स्वयंभू संस्कृती वाद्य पथकाच्या सादरीकरणावर उपस्थितांनीही ठेका धरला. महिलांची बाइकवरून निघालेली रॅली स्वागतयात्रेच्या सुरुवातीला पाहायला मिळाली. नारी शक्ती ब्रिगेड, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट, घंटाळी मित्र मंडळ, पर्यावरण दक्षता मंच, जैन मंदिर ट्रस्ट टेंभीनाका, ठाणे तेली समाज, ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग आणि मराठा मंडळ यांनी आपल्या चित्ररथांतून ‘पाणी वाचवा, पाणी साठवा’चे संदेश दिले. सरस्वती क्रीडा संकुलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके सादर केली. माथाडी व्यापारी सामाजिक संस्थेच्या वतीने दुचाकीवर तिरंग्याच्या रंगाच्या गुढ्या बाइकवर उभारल्या होत्या. तर, मागे नंदीची प्रतिकृतीदेखील पाहायला मिळाली. रानवाटा संस्थेच्या चित्ररथातून छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे दर्शन ठाणेकरांना घडले. मोरया ग्रुपची इको-फ्रेण्डली पंढरीची वारी बघ्यांचे आकर्षण ठरली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या, तर देवरुखे ब्राह्मण संघाने आपल्या चित्ररथावर ‘सहिष्णूतेचे आपण पाईक होतो आणि राहू या’ असा संदेश दिला.
भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने तारपा नृत्य सादर करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. कऱ्हाडे ब्राह्मण संघाने मी तुझा सांगाती, या विषयावरील चित्ररथांतून मोबाइलचे महत्त्व पटवून दिले. सारा फाउंडेशनने हेल्मेट वापरा अपघात टाळा, या विषयावर जनजागृती केली. थाना माहेश्वरी समाज, ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठान, विद्याभवन वसतिगृह, भिवंडी व शारदा विद्यामंदिराची मुले, आदर्श प्रतिष्ठान यांनीदेखील स्वागतयात्रेत सहभागी होण्याचा आनंद लुटला. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी विविध सेवाभावी संस्थांनी पाणी, सरबत तसेच काही खाद्यपदार्थांचे मोफत वाटप केले.
स्वागतयात्रेदरम्यान काही महिलांनी फुगड्या घातल्या. काही ठिकाणी गणेशाची आरतीदेखील सुरू होती. त्यामुळे स्वागतयात्रेतील वातावरण मंगलमय झाले होते. अंगणवाडीसेविकांनी केलेल्या नृत्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दादच नाही, तर प्रत्यक्षात भेटून त्यांची प्रशंसाही केली. राममारुती रोड येथे स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी आणि पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. बहुतेक मुले झब्बा-पायजमा, जॅकेट अशा मराठमोळ्या वेशात पाहायला मिळाली. तर, मुलींमध्ये कुणी पंजाबी ड्रेस तर कुणी साडी नेसून स्वागतयात्रेत सहभागी झाल्या होत्या. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत तरुणाईने सेल्फी विथ स्वागतयात्रेचा आनंद लुटला.

Web Title: Kupineshwar welcome card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.