...अखेर आमची निघाली सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:33 PM2018-03-04T14:33:04+5:302018-03-04T14:33:04+5:30
कल्याण: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार असो अथवा तांत्रिक कारण यामुळे सलग तीन वर्षे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहलीपासून वंचित राहावे लागले होते. परंतू यंदा ही सहल उशीरा का होईना निघाली आहे. याचा शुभारंभ शनिवारी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. तीन वर्षानंतर निघालेल्या सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद होता.

गतवर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही परिणामी विद्यार्थी सहलीपासून वंचित राहीले होते. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे देखील सहल काढण्यात आली नव्हती. दरम्यान यंदाही शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासिन कारभारामुळे सहल लांबणीवर पडली. सहलीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची वित्तीय मान्यता घेण्यात आली नव्हती. अखेर फेब्रुवारीच्या तिस-या आठवडयात पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत हा आयत्या वेळचा यासंदर्भातला प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मंजूरीसाठी दाखल करण्यात आला होता. तो सर्वपक्षिय सदस्यांनी एकमताने मान्य केला. शिक्षण विभागाच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद हिवाळयात लुटता आला नव्हता. यंदा ‘मुंबई दर्शन’ हे ठिकाण निश्चित करण्यात आले. चौथी ते आठवी इयत्तेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याचे निश्चित करण्यात आले . मुंबई दर्शनमध्ये नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, राणीची बाग आदि ठिकाण देखील ठरविण्यात आली. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २६ फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात येणार होते. त्यामुळे २६ तारखेनंतरच सहल निघेल असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते. तर २७ फेब्रुवारीला सहल निघेल असा दावा शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केला होता. परंतू नेहरू तारांगणाचे दुरूस्तीचे काम २ मार्च पर्यंत चालल्याने त्यानंतरच सहल निघेल अशी माहीती शिक्षण विभागाचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यात १ मार्चला होळी तर २ मार्चला धुलीवंदन असल्याने मार्चच्या पहिल्या आठवडयात ही सहल निघेल असा अंदाज लोकमतने व्यक्त केला जात होता. तो अखेर खरा ठरला असून शनिवारी पहिल्या टप्प्यातील ५१० विद्यार्थी सहलीला नेण्यात आले होते. महापौर देवळेकर, सभापती घोलप यांच्या प्रमुख उपस्थिती या सहलीचा शुभारंभ झाला. यावेळी शिक्षण प्रशासन अधिकारी जे जे तडवी, विस्तार अधिकारी आर टी जगदाळे, व्ही व्ही सरकटे यांसह शिक्षक वर्ग उपस्थित होता. मुंबई दर्शनमध्ये विद्यार्थ्यांना हम्बोल्ट पेंग्विन कक्ष आणि वरळी सी-लिंकची देखील सफर घडविण्यात आली. ही सहल टप्प्याटप्याने काढली जाणार असून यामध्ये महापालिका शाळांमधील चार हजार विद्यार्थी नेण्यात येणार आहे.