- अनिकेत घमंडी
डोंबिवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा 'याची देही याची डोळा' बघण्यासाठी आलेल्या समर्थकांना फडके मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिसांच्या काठ्या खाव्या लागल्या. प्रवेशद्वाराजवळील मुख्य गेटजवळ मोदी येताच आत जाण्यासाठी समर्थकांनी प्रचंड गर्दी केली, मात्र त्या गर्दीचे नियोजन न करता आल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला, त्यात १५ ते २० कार्यकर्ते कोसळले, बॅरीकेड्सवर पडले, ते तुटल्याने त्यातून वाट कशी काढायची हे देखिल त्यांना गोंधळामुळे समजले नाही. त्यातच पोलिसांनी लाठी उगारल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रतापराव दिघावकरांनी बघताच त्यांनी तात्काळ लाठीचार्ज करू नका असे सांगत, पाच पोलिस कर्मचा-यांना थांबवले.
पोलिस कर्मचाऱ्यांकडून गर्दीचे नियोजन होत नसल्याचे बघताच दिघावकरांनी स्वत: रस्त्यावर येत मुख्य प्रवेशद्वारासमोरील गर्दी मोकळी केली. मोदी भक्तांना ओरडून सांगितले की, सर्वत्र एलईडी लावल्यात आहेत त्या ठिकाणी जा, इथे गर्दी करू नका, पण तरीही जमाव काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जमावाने लोटालोटी करत पुन्हा प्रवेशद्वाराकडे धाव घेतल्याने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भाषणादरम्यान प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गोंधळ उडाला होता.
सकाळी १० वाजल्यापासूनच मोदी समर्थकांनी फडके मैदानात येण्यासाठी एकच गर्दी केली होती, त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुडुंब गर्दीचे नियोजन करतांना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. डोंबिवलीमधून ५५ बसेसमधील शेकडो कार्यकर्ते, तसेच दोनशेहून अधिक कार, टेम्पोमधून कार्यकर्ते, नागरिक मोदींना बघण्यासाठी मोठ्या गर्दीने आले होते.
लालचौकीजवळील एक रस्ता केवळ व्हीव्हीआयपींसाठी राखून ठेवला होता. त्यामुळे तेथून कोणालाही एंट्री देण्यात आली नव्हती. ठाण्याच्या वाहतूक नियंत्रण पोलिस अधिकारी, कर्मचा-यांकडे ती व्यवस्था देण्यात आली होती. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारासाठी डम्पिंगजवळील हमरस्त्याने अग्नीशमन दलाच्या बाजूच्या गेटने एंट्री होती. नगरसेवक असो की भाजपाचे पदाधिकारी सा-यांनाच तेथूनच प्रवेश देण्यात आला होता, त्यामुळे पोलिसांची मोठी फौज लावूनही काहीही फायदा झाला नाही, अखेरीस व्हायचे तेच झाले, पोलिस कर्मचा-यांनी काही जणांवर लाठी चार्ज केला, त्यात काहींच्या चपला पायातून निघाल्याने त्यांनी त्या घेण्यासाठी प्रयत्न केले.
बॅरीकेड्समध्ये त्यांच्या चपला अडकल्या होत्या. पडलेले बॅरीकेड्स उचलण्यासाठी पोलिसांना काम करावे लागले. त्यामुळेही काही काळ भाषणे सुरू झाल्यानंतर मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. दिघावकरांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थिती हाताळली, अन्यथा जनप्रक्षोभाला पोलिसांना सामोरे जावे लागले असते.
पण या साऱ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती, ज्या युवकांना काहीसा मार बसला, त्यांच्यामध्ये संताप व्यक्त झाला. कल्याण पूर्व, तसेच उल्हासनगरमधील ते मोदीभक्त असावेत, अशी माहितीही सांगण्यात आली.