ठाणे : यापुढे खड्ड्यांमुळे एखाद्याचा नाहक बळी गेल्यास चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी भिवंडीतील एका बैठकीत दिला. भिवंडीमध्ये होणाऱ्या वाहतूककोंडीबाबतचा आढावा घेताना त्यांनी हा इशारा दिला.
भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात बुधवारी शहरात होणाऱ्या वाहतूककोंडी संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, तहसीलदार, जिल्हा परिषद सदस्य, जवळपासच्या गावांचे सरपंच आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत चव्हाण म्हणाले, कशेळी ते अंजुरफाटा, भिवंडी आणि मानकोली ते खारबाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे वारंवार किरकोळ आणि गंभीर स्वरुपाचे अपघात होत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच या मार्गावर वारंवार वाहतूककोंडीही होत असून, तासनतास नागरिकांना रस्त्यावर थांबावे लागते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या संघटना रस्ते दुरुस्तीसाठी आंदोलनेही करत आहेत. याच बैठकीमध्ये काही लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदारांवरही कारवाईची मागणी केली. त्यामुळे यापुढे जर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्याचे आढळले, तर त्याची पडताळणी केली जाईल. यात तथ्यता आढळली तर संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराच चव्हाण यांनी दिला. तसेच रस्ते दुरुस्ती आणि टोलवसुली बंद करण्याच्याही सूचना काही नागरिकांनी केल्या. त्या अनुषंगानेही शासनाकडे पत्रव्यवहार करणार असून, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चर्चा
कशेळी ते अंजुरफाटा, भिवंडी आणि माणकोली ते खारबाव या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
------------