कल्याण/डोंबिवली : अयोध्येत राममंदिर बांधून कोरोना जाणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चातर्फे राज्यभरातून ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्रे त्यांना पाठविली जाणार आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवलीतून गुरुवारी त्यांना हजारो पत्रे पाठवण्यात आली.
भाजयुमोचे प्रदेश सचिव निखिल चव्हाण म्हणाले की, ‘पवार यांंनी अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, हे आम्हालाही माहीत आहे. येत्या ५ आॅगस्टला अयोध्येत रामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होत आहे. या चांगल्या कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी होऊ नये. हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकू नये. पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर म्हणून त्यांच्या सिल्व्हर ओक या घरी कल्याणमधून किमान २० हजार पत्रे पाठविली जाणार आहेत.’
दरम्यान, डोंबिवलीतूनही पवार यांना हजारो पत्रे पाठवण्यात आली. डोंबिवलीतील मुख्य पोस्ट आॅफिस येथे युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष मिहीर देसाई, डोंबिवली ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष अमित चिकणकर यांनी ही पत्रे जमा केली.
ठाण्यातूनही पाठवलीत पत्रे
ठाणे : ठाण्यातील जेल तलावासमोरील मुख्य पोस्ट आॅफिसमधून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत ‘जय श्रीराम’ लिहिलेली हजारो पत्रे पवार यांना पाठविली आहेत. यावेळी भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष निलेश कोळी, भाजप आध्यात्मिक सेलचे संयोजक गजानन प्रधान, ठाणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस हृषीकेश मोरे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रभरातून १० लाख पत्रे पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठविली जाणार असल्याचे निलेश कोळी यांनी सांगितले.
पवारांकडे पत्रे रवाना
भिवंडी : राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा भाजप युवा मोर्चाने निषेध केला आहे. भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष विशाल पाठारे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीतून श्रीराम लिहिलेली पाच हजार पत्रे पवार यांच्या निवासस्थानी पाठविण्यास सुरुवात केली आहे. राजू चौघुले, अॅड. संदीप जडेजा, मोहन कोंडा, अनिल केशरवानी, राकेश राणा, नरेश दायमा, नंदन गुप्ता, गणेश पोटीगारु, दिलीप साठे आदी उपस्थित होते.