सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील रिपाइंच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय हितचिंतकाकडून जीवाला धोका निर्माण झाल्याने, खाजगी बंदूकधारी सरंक्षण ठेवल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. या प्रतिक्रियेमुळे शहर राजकारणात एकच खळबळ उडाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्तेची चाबी रिपाइंकडे राहणार असल्याचे संकेत दिले.
राज्यात व देशात रिपाइं आठवले गटाची आघाडी भाजप सोबत असताना, उल्हासनगरात रिपाइं भाजपऐवजी शिवसेने सोबत गेली. याला पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव हे कारणीभूत आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी शहाराध्यक्ष भगवान भालेराव यांच्या निर्णयाला आक्षेप घेतला नाही. दरम्यान महापौर निवडणूक वेळी सत्ताधारी भाजप मधील ओमी टीम समर्थक नगरसेवकांना शिवसेना गोटात आणण्याची किमया भगवान भालेराव यांच्यासह अन्य जणांनी पार पाडल्याने, शिवसेनेला महापौर तर भगवान भालेराव यांना उपमहापौर पद मिळाले. तसेच भाजपातील बंडखोर स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांना शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिल्याने, ते स्थायी समिती सभापती निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सभापती पदावरून शिवसेना व भगवान भालेराव यांच्यात वाद निर्माण झाला.
महापालिका स्थायी समिती सभापती पद मला नाहीतर शिवसेनेला नाही. या हट्टातून भालेराव यांनी शिवसेना मित्र पक्षातून बाहेर पडून भाजपकडे गेले. तसेच स्थायी समिती पदी भाजपचे टोनी सिरवानी यांना स्थायी समिती सभापती पदी निवडून आणले. शिवसेना युती पासून रिपाईने काडीमोड घेतल्यानेच, काही हितचिंतकाकडून माझ्या जिवाला धोका निर्माण झाल्याची माहिती उपमहापौर भालेराव यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान पोलीस आयुक्तांना पोलीस संरक्षणाची मागणी केली. मात्र ती न मिळाल्याने, अखेर स्वतःच्या खर्चातून दोन खाजगी बंदूकधारी सरंक्षणासाठी ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या पाच वर्षात रिपाइंची ताकद वाढली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पालिका सत्तेची चाबी रिपाइंकडे असण्या इतपत नगरसेवक निवडून येणार असल्याची माहिती भालेराव यांनी दिली. यातूनच आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच महापालिका निवडणुकी पूर्वीच एकमेका विरोधात चिखलफेक सुरू झाली आहे.