बदलापूरच्या ग्रामीण भागात वीज गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:20 AM2019-09-17T00:20:58+5:302019-09-17T00:21:08+5:30
ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे.
बदलापूर : ग्रामीण भागातील राहटोली भागात चार दिवसांपासून अंधार पडला आहे. गावाला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बंद पडल्याने तो बदलण्यासाठी विलंब झाला आहे. ज्या ठिकाणी हे रोहित्र आहे, त्या ठिकाणी गाडी पोहोचत नसल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब झाल्याचे वीज वितरण विभागाने स्पष्ट केला आहे. तर, ग्रामपंचायतीने रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण न काढल्याने हा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चार दिवस राहटोलीकरांना अंधारात काढावे लागले.
बदलापूर शहरातील महावितरणचा भोंगळ कारभार अनेकदा नागरिकांना अनुभवास येतो. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही त्याचा मोठा त्रास आहे. बदलापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या राहटोली गावातील वीजपुरवठा शुक्र वारी खंडित झाला होता. त्यावेळी गावातील रोहित्र नादुरुस्त झाल्याचे उघड झाले. याबाबत ग्रामस्थांनी बदलापूरच्या महावितरण कार्यालयाशी संपर्ककेला. त्यांना तातडीने रोहित्र बसवण्यात येईल, असे आश्वासन मिळाले; मात्र चार दिवस उलटूनही रोहित्र बसवण्यात महावितरणला अपयश येत होते. ज्या ठिकाणी रोहित्र बसवायचे नियोजन होते, त्या ठिकाणी रोहित्र नेण्यासाठी योग्य रस्ताच नसल्याची बाब समोर आली.
त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारावर येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते. महावितरण विभाग रोहित्र बसवण्यास तयार असतानाही त्याठिकाणी रोहित्र पोहोचवणे अवघड जात आहे. भविष्याचा विचार करून रोहित्राच्या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मागणीही होत आहे.