वीज पडून गाय ठार तर महिला किरकोळ जखमी; रस्ता नसल्यामुळे 4 किलोमीटरचा प्रवास झोळीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:15 PM2020-07-01T17:15:19+5:302020-07-01T17:15:32+5:30
सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले होते, विजेच्या कडकडाट सुरू होता
- हुसेन मेमन
जव्हार: जव्हार तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चांभारशेत पैकी भुसार पाडा येथे मंगळवार दि.३०/०६/२० रोजी सायंकाळी ५:०० च्या सुमारास चंद्रकांत लक्ष्मण सापटा यांच्या घरावर वीज पडून एक गाय ठार झाली तर त्यांच्या पत्नी सुनिता चंद्रकांत सापटा यांना विजेचा कमी तीव्रतेचा धक्का लागला असल्याची घटना घडली आहे. सुनीताला जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले होते, विजेच्या कडकडाट सुरू होता, अचानक सापटा यांच्या घरावर 5 वाजेच्या दरम्यान वीज घरातील कौल फोडून गोठयात बांधलेल्या गायीवर पडली आणि गाय जागीच ठार झाली दरम्यान सुनीता ही घरातच होती, ती लांब असल्यामुळे सुदैवाने तिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली, वीज गोठ्यात पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
भुसारपाडा हा गाव चांभारशेत पासून 4 किलोमीटर दूर असून तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने जखमी महिलेच्या पायाला जखम झाल्यामुळे तिला चालत येत न्हवते, म्हणून गावकऱ्यांनी तिला झोळीत चांभारशेत येथे घेऊन आले, नंतर तिला वाहनात जव्हार येथे आणण्यात आले असून, तिच्यावर कुटिर रुग्णालयात उपचार सुरू असुन सायंकाळ पर्यंत तिला सोडले जाईल तसेच पंचनामा करण्यात आला असल्याची माहिती तलाठी बिराजदार यांनी दिली.