उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना दारू, गांजा व गुटखा
By सदानंद नाईक | Published: May 8, 2024 05:52 PM2024-05-08T17:52:09+5:302024-05-08T17:52:39+5:30
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचार करण्यासाठी येतात.
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक दारू, गांजा, गुटखा आदी साहित्य पुरवीत असल्याचे उघड झाले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण नातेवाईकांच्या अंगझडतीत दारू, गांजा, गुटका सापडल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बनसोडे यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिक उपचार करण्यासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची परिस्थिती मध्यवर्ती रुग्णालयाची आहे. रुग्णालयाच्या भिंती व स्वच्छतागृह गुटक्याच्या फिचकाऱ्याने रंगल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या लक्षात आले. त्यांनी रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची रुग्णालय प्रवेशद्वारवर अंगझडती घेण्याचे आदेश दिले. या अंगझडतीत रुग्णांच्या नातेवाईकडे दारू, गांजा, गुटखा, तंबाखू आदी पदार्थ सापडत असल्याचे उघड झाले. काही रुग्णाच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून आणलेल्या दारूच्या बॉटल रुग्णालय सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याने, एकच खळबळ उडाली.
मध्यवर्ती रुग्णालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र याला काही रुग्णांचे नातेवाईक छेद देत असल्याचे डॉ मनोहर बनसोडे म्हणाले. रविवारी रात्री असाच प्रकार उघड झाला असून रुग्णांच्या नातेवाईकडून अंतरवस्त्रात लपून ठेवण्यात आलेल्या दारूच्या बॉटल सुरक्षा रक्षकांनी जप्त केल्याची माहिती डॉ बनसोडे यांनी दिली. यापुढे रुग्णांच्या नातेवाईकसह संबंधितांवर कारवाईचे संकेत रुग्णालय प्रशासन यांनी दिले आहे. थेट रुग्णालयात नशेली प्रदार्थाची विक्री रुग्णांना होत असल्याने, मध्यवर्ती रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे