स्थायी सदस्यांची यादी जाहीर

By admin | Published: March 2, 2016 01:50 AM2016-03-02T01:50:21+5:302016-03-02T01:50:21+5:30

मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणाऱ्या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेतदेखील तब्बल दोन तास

List of Permanent Members | स्थायी सदस्यांची यादी जाहीर

स्थायी सदस्यांची यादी जाहीर

Next

ठाणे : मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणाऱ्या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेतदेखील तब्बल दोन तास खलबते केल्यानंतर आपल्या सदस्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे शिवसेनेने एक अनुभवी पदाधिकारी दिला असून भाजपाचे संजय वाघुले यांची पुन्हा स्थायीत वर्णी लागली आहे. त्यामुळेच आता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार, हे निश्चित मानले जात आहे.
स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह रिपाइंचे रामभाऊ तायडे, सुधीर भगत, राधाफतेबहादूर सिंह, मिलिंद पाटील, सिराज महमद अली डोंगरे, दीपक वेतकर आणि भाजपाचे संजय वाघुले यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवड केली गेली आहे. २० फेबु्रवारी रोजी झालेल्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली नावे पीठासीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. परंतु, शिवसेनेमध्ये काही नावांवरून मतभेद राहिल्याने अखेर उपायुक्तांना झालेल्या मारहाणीचा निषेध करून ही महासभाच पूर्णवेळेसाठी तहकूब केली होती.
दरम्यान, सोमवारीसुद्धा दुपारी २ वाजता महासभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेनेत नावावरून मतभेद झाल्याने ही यादी लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अखेर, १५ मिनिटांसाठी महासभा तहकूब करून त्यानंतर सुरू झालेल्या सभेत शिवसेनेच्या नावांवर एकमत झाले. त्यानुसार, शिवसेनेतून ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत, दशरथ पालांडे, उमेश पाटील आणि संभाजी पंडित यांची नावे जाहीर झाली. तर, भाजपामधून संजय वाघुले यांची पुन्हा निवड झाली. तसेच राष्ट्रवादीकडून सुहास देसाई आणि प्रमिला केणी आणि काँग्रेसकडून यासीन कुरेशी यांची नावे जाहीर करण्यात आली.
सुरुवातीला सेना भाजपाला स्थायी समिती सोडणार नसल्याचा गवगवा केला गेला होता. परंतु, अखेर शिवसेनेने दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेवटच्या वर्षी स्थायीच्या चाव्या भाजपाच्या वाटेला येणार आहेत.

Web Title: List of Permanent Members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.