लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना लोकल पास, इतरांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:46 AM2021-08-17T04:46:16+5:302021-08-17T04:46:16+5:30
उल्हासनगर : लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाणपत्र रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांकडून तपासल्यानंतर लोकल पास देण्यात ...
उल्हासनगर : लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाणपत्र रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांकडून तपासल्यानंतर लोकल पास देण्यात येत आहे. मात्र, एक डोस घेणाऱ्यांची गैरसोय वाढली असून, आपण कार्यालयाला जायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
शासनाच्या आदेशन्वये स्वातंत्र दिनापासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली. त्यांच्या लसीच्या प्रमाणपत्राची नोंदणी रेल्वे स्थानकात तैनात केलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर, त्यांना लोकल पास देण्यात येत आहे. शहरांतर्गत उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड अशी तीन रेल्वे स्थानक असून, तिन्ही ठिकाणी महापालिकेने कर्मचारी तैनात केले आहेत. शहरात लसीचे दोन डोस घेणाऱ्यांची संख्या २७ हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती महापालिका लसीकरण केंद्राच्या समन्वयक डॉ.अनिता सपकाळे यांनी दिली. पहिल्या दिवशी ५०० जणांनी रेल्वे पास काढले असून, आजपर्यंत एकूण संख्या तीन हजारांपेक्षा जास्त झाली. लोकल पासधारक नागरिकांची संख्या वाढल्याने, रेल्वे स्थानक नागरिकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे.
लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची संख्या मोठी असून, त्यापैकी अनेकांनी लसीचा एकच डोस घेतला. त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी अवधी असल्याने, लोकल पास घेण्यास अडचणी येत आहेत. त्यांनी दुसरा डोस त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी करून शासनाच्या धोरणावर टीका करीत आहेत. कोरोना महामारीत नागरिकांना दिलासा देण्याचे काम शासनाने करायला हवे. मात्र, शासन विविध अटी, शर्ती, नियम आणून नागरिकांची पिळवणूक सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लसीचे डोस न घेतलेल्या गोरगरीब व गरजू नागरिकांनी मुंबईसह इतर ठिकाणी जायचे कसे, असा प्रश्नही अनेकांना पडला. एकूणच शासनाच्या धोरणावर सर्वस्तरातून टीका होत आहे. लोकलमध्ये विनातिकीट व पास प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उल्हासनगर रेल्वे प्रबंधक मनोहर पाटील यांनी दिली असून, नागरिकांनी स्वतःसह कुटुंबासाठी लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.