Lockdown News: गावी जाण्यासाठी मजुरांच्या आशा पल्लवित; ठोस मार्ग मिळत नसल्याने मात्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 01:23 AM2020-05-03T01:23:58+5:302020-05-03T01:24:14+5:30
यंत्रणांकडून केवळ नावनोंदणीची प्रक्रिया सुरू
अनिकेत घमंडी
डोंबिवली : देशातील लॉकडाउन वाढला तरी नाशिक तसेच देशातील काही भागांतून मजुरांना घेऊन श्रमिक एक्स्प्रेस रवाना झाल्या आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील मजूर ‘काहीही करा पण, आम्हाला मूळ गावी सोडा,’ अशी विनंती पोलीस, महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना करत आहेत. गावी जाण्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी ते शनिवारी शहरातील पोलीस ठाणी, केडीएमसी व नगरसेवकांची कार्यालये गाठताना दिसत होते. परंतु, यंत्रणेकडून योग्य हमी मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
शहरातील आयरे गाव, शेलारनाका, पाथर्ली, आजदे, सोनारपाडा, दावडी, गोळवली, सुचकनाका आदी ठिकाणी मजूर अडकून पडले आहेत. शेलार नाक्याजवळील कामगारांनी शनिवार सकाळपासूनच गावाला जाण्यासाठी रांग लावत आम्हाला फॉर्म द्या, अशी विनवणी केली. तेलांगणा येथे जाण्यासाठी डोंबिवलीतील ४० बिगारी काम करणाऱ्या मजुरांनी फॉर्म मिळवून त्यावर नाव, फोन नंबर व आधार कार्ड नंबर लिहून तो पोलीस ठाण्यात देण्यासाठी प्रयत्न केले. फॉर्म भरण्यासाठी ते सर्व जण रामनगर पोलीस ठाण्यात आले. परंतु, तेथे त्यांना पोलिसांनी हटकल्याने त्यांची पांगापांग झाली. काही वेळाने दक्ष नागरिकांनी त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी सहकार्य केले.
दुसरीकडे पाथर्लीतील कामगारांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु, त्यांना कोणताही फॉर्म नाही, महापालिकेशी संपर्क करा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी नगरसेवक निलेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. म्हात्रे यांनी याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधताच त्यांना हे काम लोकप्रतिनिधी म्हणून आपण करावे असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर रामनगर पोलीस ठाण्यात फॉर्म स्वीकारला जात असताना टिळकनगर पोलीस ठाणे का घेत नाही, असा सवाल म्हात्रे यांनी केला. अखेर त्यांनी महापालिका सचिव संजय जाधव यांच्याशी मोबाइलद्वारे संभाषण करून तोडगा काढण्यासाठी विनंती केली. त्यामुळे नेमके आदेश काय आहेत हे न समजल्याने सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते.
ठाकुर्लीतील चोळा हाउस परिसरातील काही मजूर, कामगार गावी जाण्यासाठी विष्णूनगर पोलीस ठाणे, केडीएमसीचे ‘ह’ प्रभाग कार्यालय असे फिरत होते. परंतु, त्यांची मोठी गैरसोय झाल्याने गावाला जायचे कसे? हा मोठा पेच त्यांच्यासमोर आहे. आधीच ठेकेदाराने पगार दिला नाही, त्यामुळे त्यांची दैनावस्था झालेली असतानाच आता शासकीय यंत्रणाही सहाय्य करत नसल्याने काय करावे, असा सवाल ते करत होते.
पालिकेने नेमले अधिकारी
भाईंदर : परराज्यात तसेच राज्यात आपल्या घरी जाण्यासाठी परवानगी मिळण्याचा मार्ग खुला होताच शहरातील पोलीस ठाण्यांवर इच्छुकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात नागरिकांनी अर्ज तसेच माहिती घेण्यासाठी गर्दी केल्याने पोलिसांना आमच्याकडेच आदेश आले नसल्याचे फलक लावावे लागले. तर महापालिकेने मात्र परराज्यात वा राज्यात जाणाºयांसाठी पालिका अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. सरकारचा निर्णय आल्यापासून तसेच मुंबईतील पोलीस ठाण्यांचे आॅनलाइन अर्ज फिरु लागल्याने मीरा भार्इंदरमधील पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. गर्दी पाहता आता पोलिसांनी याबाबतचे आदेश, पत्रक आलेले नसल्याने गर्दी करु नये असे फलकच लावले आहेत. दरम्यान, आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. शिवाय तीन अधिकारी व अन्य कर्मचारीही मदतीला दिले असून इच्छुकांनी त्यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
भिवंडी-गोरखपूर रेल्वे गाडी झाली फुल
भिवंडी : लॉकडाउनमुळे कामगार,रोजंदारीवर काम करणाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगार पायी आपल्या गावाला निघाले आहेत. त्यातच शुक्र वारी लॉकडाउन वाढवल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी ते गोरखपूर दरम्यान शनिवारी विशेष श्रमिक गाडीची व्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली. पोलिसांनी सामाजिक अंतराचे पालन करून चोख व्यवस्था केली होती.
मजुरांसाठी टावरे स्टेडियम, एसटी स्टॅन्ड, संपदा नाईक हॉल, हरीधारा इमारत तसेच कोनगाव येथील मैदानात बसण्याची व्यवस्था केली होती. दरम्यान, मजुरांनी सर्वच ठिकाणी एकच गर्दी केल्याने १२०० सीटची ही विशेष गाडी अवघ्या काही वेळातच फुल झाली. ही गाडी भिवंडी रेल्वेस्थानकातून सायंकाळी सातच्या सुमारास सुटणार होती. मात्र प्रवाशांची वैद्यकीय चाचणी व ओळखपत्र तपासणीस उशीर होणार असल्याने ही गाडी रात्री उशिरा सुटली. दरम्यान, आता बुकिंग फुल झाली असून नागरिकांनी शहरात गर्दी करू नये अन्यथा संचारबंदी कायद्यानुसार कारवाई करावी लागेल असे आवाहन भिवंडी पोलिसांनी केले आहे.