- नितीन पंडित भिवंडी- भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा ६६ हजार २९२ मतांनी विजयी झाले. दोन वेळा खासदार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचा बाळ्यामामा यांनी पराभव केला आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रथम करणार, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तुमच्या विजयाचे श्रेय तुम्ही कोणाला देता? माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे नागरिकांचे आहे. ही निवडणूक नागरिकांनी आपल्या हातात घेतल्यानेच केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव करणे शक्य झाले. पाटील यांच्या दादागिरीला सामान्यांनी दिलेले हे उत्तर आहे. दहा वर्षे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांनी भिवंडीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मतदारांनी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी जे पेराल तेच उगवेल आणि याची प्रचिती पाटील यांच्या पराभवातून समोर आली आहे.
भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा तुम्हाला झाला का? हो निश्चितच झाला. २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी लाटेचा त्यांना फायदा झाला होता, तर २०१९ मध्ये संपूर्ण शिवसेना त्यांच्या सोबत होती. मात्र ते निवडून आल्यानंतर मोठ्या गुर्मीत राहिले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कमी लेखणे, मनमानी करणे यामुळे मुरबाड आणि भिवंडीतील नागरिक त्यांच्यावर नाराज होते. किसान कथोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला दिलेली वागणूक चुकीची आहे. राजकारणात ‘हम करे सो कायदा’ अशी हेकेखोरी चालत नाही, हे बहुधा पाटील विसरले असावेत.
सांबरे यांच्या उमेदवारीमुळे तुमचा विजय झाला? नीलेश सांबरे यांनी जातीचे राजकारण केल्यामुळे कुणबी मते निश्चितच त्यांच्या बाजूने वळली. मात्र मतदार मला साथ देतील यावर माझा विश्वास होता. त्यामुळे माझा विजय हा येथील नागरिकांमुळेच झाला असे मी मानतो.
खासदार म्हणून कुठल्या कामाला प्राधान्य असेल? नागरिकांना धमकावणे, त्यांच्या जमिनी बळकावणे अशी कामे खासदार कपिल पाटल यांनी केली आहेत. येथील नागरिकांना धीर व आधार देत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर पाटील व त्यांच्या गुंडांनी व कार्यकर्त्यांनी कब्जे केले आहेत ते शेतकऱ्यांना परत देण्याचे काम मी आधी करणार आहे. काल्हेर येथील सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणांची मी पाहणी केली.
नागरिकांचे कुठले प्रश्न सोडवणे गरजेचे आहे? भिवंडीत सध्या वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली आहे. येथील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून पावसाळ्यात होणारी वाहतूककोंडी तातडीने सोडविणे गरजेचे आहे.