भाजपा सरकारचे काम लोका सांगे विस्तारक
By admin | Published: May 9, 2017 01:07 AM2017-05-09T01:07:41+5:302017-05-09T01:07:41+5:30
वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील आयारामांच्या भाजपा प्रवेशामुळे पक्षात बेशिस्त बोकाळल्याची टीका होत असतानाच
अनिकेत घमंडी । लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील आयारामांच्या भाजपा प्रवेशामुळे पक्षात बेशिस्त बोकाळल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्र व राज्य सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता रा.स्व. संघाच्या प्रचारकांच्या धर्तीवर पक्षाचे विस्तारक देशभर धाडण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द मोदी, शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही विस्तारक म्हणून समाजात मिसळणार आहेत. एकट्या कल्याण जिल्ह्यातून ६०० विस्तारक १०६० बुथमध्ये प्रचाराला घराबाहेर पडणार आहेत.
संघाच्या प्रचारकांनी कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करून साधी जीवनशैली अवलंबावी, अशी अपेक्षा असते. त्याचप्रमाणे पक्षाच्या विस्तारकांनीही कार्यकर्त्यांकडे राहायचे आहे. किमान १५ दिवस विस्तारक म्हणून काम करणे अपेक्षित असून सहा महिने किंवा वर्षभर विस्तारक म्हणून सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी असलेल्यांना देशभरात कुठेही दौरा करण्याकरिता धाडले जाणार आहे. या कालावधीत विस्तारकांनी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच समाजातील डॉक्टर, वकील, उद्योजक, व्यापारी, शिक्षक यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना सरकारच्या कामगिरीची माहिती द्यायची आहे.
कल्याण जिल्ह्यातील भाजपाच्या सदस्यांची संख्या १ लाखांहून अधिक असली, तरी विस्तारक होण्याकरिता सुमारे ६०० कार्यकर्ते सिद्ध झाल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली. २५ मे ते १५ जून या कालावधीत हे विस्तारक घरोघरी जातील. विस्तारकांनी केंद्र व राज्य सरकारची कोणती कामे लोकांपर्यंत पोहोचवायची, त्या वेळी त्यांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची कशी उत्तरे द्यायची, लोकांमध्ये मिसळताना कोणती पथ्ये पाळायची, याबाबतची माहिती देण्यासाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात शुक्रवार, १२ मे रोजी दिवसभराची कार्यशाळा आयोजित केली आहे.
पंतप्रधान मोदी हे संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून एकेकाळी कार्यरत होते. पक्षात बाहेरून आलेल्या लोकांमुळे पक्षशिस्तीला बाधा येत असल्याच्या तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानेच त्यांनी संघ प्रचारकांच्या धर्तीवर विस्तारक नियुक्त करण्याची ही योजना अमलात आणल्याचे बोलले जाते. त्यामुळे नवभाजपावाद्यांचा प्राधान्याने या कामासाठी विचार केला जाऊ शकतो किंवा त्यांना पुढील काळात निष्ठावंत पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकणे भाग पडू शकते.
केंद्र व राज्य सरकारने अनेक लोकोपयोगी योजना अमलात आणल्या असल्या, तरी सरकारच्या चुका मीडियात ठळकपणे मांडल्या जातात. परिणामी, सरकारची बदनामी होते. त्याचा फटका भविष्यातील निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे विस्तारकांनी सरकारी योजनांची लोकांना माहिती देणे, विस्तारक म्हणून काम करताना येणाऱ्या अनुभवांची नोंद करणे, शहर, ग्राम आणि तालुका, जिल्हास्तरावर कोणकोणत्या योजनांची माहिती मिळालेली आहे अथवा नाही, याचे अवलोकन करणे. ती माहिती पक्षाच्या जिल्हा कार्यालयांमार्फत वरपर्यंत पोहोचवणे अपेक्षित आहे.
विस्तारकांनी किमान १५ दिवस स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून केवळ पक्षकार्यासाठी वेळ द्यावा, ही अपेक्षा आहे. जर एखाद्या कार्यकर्त्याला कौटुंबिक अडचण आली, तर अपवादात्मक बाब म्हणून सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत विस्तारक म्हणून काम करून रात्री घरी जाण्याची मुभा दिली आहे. पुरुषांसह महिलांनीही या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.