भिवंडीत मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय; अनेक दुकानांसह घरांमध्ये शिरले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:36 PM2020-08-05T15:36:46+5:302020-08-05T15:58:44+5:30
तालुक्यातील प्रमुख नद्यांपैकी कामवारी व वारणा नद्यांना जोरदार पूर आल्याने त्या दुथडीने वाहत आहेत.
भिवंडी - यावर्षी सुरुवातीच्या पावसनंतर दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार आगमन केले असून मध्यरात्रीपासून धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होऊन ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला आहे.तर अनेक दुकांनासह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहवयास मिळत असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून बहुतांश घरांमध्ये व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे तर यावर्षी नाले सफाई व्यवस्थित झाली न नसल्याने नाले, गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले आहे.शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल , नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, भाजीमार्केट,नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे खूपच हाल झाले आहेत. तीनबत्ती येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला व अन्य वस्तू देखील वाहून गेल्या आहेत.
तालुक्यातील प्रमुख नद्यांपैकी कामवारी व वारणा नद्यांना जोरदार पूर आल्याने त्या दुथडीने वाहत आहेत. तर महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी, ईदगाहरोड येथील कामवारी नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने पालिका प्रशासनाने त्यांना दुसरीकडे सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे. दरम्यान पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड,अंजूरफाटा,रांजणोली बायपास नाका, माणकोली नाका,वंजारपट्टीनाका,नारपोली,नझराना सर्कल,भिवंडी - वाडा रोडवरील नदीनाका अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.