मच्छिमारांसाठी शासन तिजोरी रिकामी करण्यासही तयार, महादेव जानकर यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 10:00 PM2019-11-04T22:00:01+5:302019-11-04T22:00:52+5:30
सततचा पाऊस, वादळ यामुळे ऐन मासेमारी हंगामात पारंपारिक मासेमारी करणाराया मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असुन त्याचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी भाईंदरच्या उत्तन भागास भेट दिली.
मीरारोड - सततचा पाऊस, वादळ यामुळे ऐन मासेमारी हंगामात पारंपारिक मासेमारी करणाराया मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असुन त्याचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी भाईंदरच्या उत्तन भागास भेट दिली. मच्छीमारांच्या मदतीसाठी साडे तीन हजार कोटी रुपयांचा निधी आला असून, तुमच्यासाठी शासन तिजोरी रिकामी करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. यावेळी मच्छीमारांसह त्यांच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अडचणी जाणून घेतल्या. कोळी महिलांनी मात्र, मंत्री केवळ खोटी आश्वासनं देऊन निघून जातात असा संताप व्यक्त केला.
पर्ससीन नेट, एलईडी पध्दतीच्या मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर आधीच संक्रांत आली आहे. शिवाय समुद्रातील वायु-तेल सर्वेक्षणामुळेसुध्दा मच्छीमार नुकसान सोसतोय. १ ऑॅगस्टपासून मासेमारीला सुरवात झाली असली तरी सततचा पाऊस, वादळी वारे आणि वादळांमुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झालेले आहे. मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना रिकाम्या हाताने परतावे लागतेय. बर्फ, डिझेल, किराणा तसेच खलाशांची मजुरीचा खर्च मच्छीमारांच्या माथी बसत आहे. मासेमारी करण्यास मुकावे लागत आहे. जेणेकरून मच्छीमार हवालदील झाले आहेत. उत्तन, पाली, चौक भागातील मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार राजन विचारेंसह मच्छीमार संस्थांनी केली होती.
दरम्यान मंत्री महादेव जानकर यांनी आज भाईंदरच्या उत्तन भागातील मच्छीमारांच्या वसाहतीस भेट दिली. त्यांनी समुद्र किनारी पाहणी केली. मच्छीमारांसह मच्छीमार संस्थांच्या पदाधिकारायांशी चर्चा करुन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी दिलेली निवेदने स्वीकारली. मच्छीमारांच्या नुकसानी बाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश जानकर यांनी दिले.
आपण मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. वादळ, पाऊस यामुळे मच्छीमारांचे सुध्दा नुकसान झाले असून, त्याचा आढावा घेण्यासाठी आलो आहे. नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजेत. मच्छीमारांसाठी मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केले असून साडे तीन हजार कोटी रुपये आले आहेत असे जानकर म्हणाले. राज्याची तिजोरी मच्छीमारांसाठी रिकामी करण्यास शासन तयार आहे. येत्या एक - दोन वर्षात समस्या सोडवणार असे आश्वासन त्यांनी मच्छीमारांना दिले.
या वेळी स्थानिक नगरसेवक एलायस बांड्या, नगरसेविका हेलन गोविंद व शर्मिला गंडोली, चारही मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी, जॉर्जी गोविंद, विल्यम गोविंद, वेलेरीन पांड्रिक, शॉन कोलासो, डिक्सन डिमेकर, बस्त्याव भंडारी, मेस्तर बावीघर आदींसह अधिकारी वर्ग उपस्थित होते. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा हा भाजपा व शिवसेना या मोठ्या पक्षांनी सोडवला पाहिजे, असे सांगत राज्यात पुन्हा भाजपा - शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार येणार, असा विश्वास जानकर यांनी बोलून दाखवला.
दरम्यान कोळणींनी मात्र यावेळी जानकर यांच्या आश्वासनांवर टीकेची झोड उठवली. मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, यावेळी आम्ही कोळी बांधवांसाठी काही तरी करणार. पण प्रत्येक वेळेला मंत्री येतात आणि कोळी बांधवांना फक्त आश्वासनं देतात व निघुन जातात. आमच्या बोटी वादळ - पावसामुळे घरी आहेत. एका - एका बोटीवर २५ माणसं खलाशी जातात. म्हणजे २५ कुटुंब एका बोटीवर उदरनिर्वाहासाठी जात असतात. एका खेपेसाठी सुमारे ५० हजारांचा खर्च येतो. पण वादळ - पावसामुळे बोटी रिकाम्या परततात वा जाणेच शक्य होत नाही. समुद्रात अपघात झाला तरी मदत मिळत नाही. आमची तरुण मुलं अपघातात गेली. पण आम्हाला काय मिळतेय ? असा सवाल संतापलेल्या कोळणींनी केला.