महाराष्ट्र निवडणूक २०१९: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानात घट; कोणाला बसणार फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 06:13 PM2019-10-22T18:13:29+5:302019-10-22T18:14:16+5:30
Thane Vidhan Sabha Election : दुसरीकडे राष्ट्रवादीने मनसेला टाळी दिली असली तरी राष्ट्रवादीला मानणारा मतदार मतदानासाठी कमी संख्येने उतरला असावा अशी चर्चा आहे
ठाणे : ठाणे शहर मतदारसंघातील पाच उमेदवारांचा फैसला सोमवारी मतपेटीत बंद झाला. मागील वेळेच्या तुलनेत यंदा ४.०९ टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. याची आता वेगवेगळी कारणे पुढे येत असली पर्याय असतानाही शिवसेनेच्या या बालेकिल्यात मतदानाच्या टक्केवारीत घट का झाली याची चर्चा मात्र सुरु झाली आहे. या ठिकाणच्या समस्या सुटलेल्या नाहीत, की विद्यमान आमदाराकडून मतदारांची निराशा झाली, आदींसह इतरही कारणे आता चर्चेला आली आहेत. परंतु, या घटलेल्या टक्केवारीचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठाणे शहर मतदारसंघात ५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही भाजप विरुद्ध मनसे अशीच झाली आहे. मागील वेळेस युती व आघाडी न झाल्याने भाजप विरुद्ध शिवसेना तर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होती. परंतु, आताच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने भाजप येथून लढली. मात्र, आघाडीकडून राष्ट्रवादीने अंतिम क्षणी माघार घेऊन मनसेला पाठिंबा दिला. यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी या मतदारसंघाची निवडणूक ही शेवटच्या क्षणी चुरशीची झाल्याचे चित्र पाहावायस मिळाले. मनसेला राष्ट्रवादीने थेट टाळी दिली, तर काँग्रेसने अखेरच्या क्षणी छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीची समीकरणे काहीशी बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होईल, असेही बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कोणत्या बुथमधून टक्केवारीत घट झाली, याचा उहापोह शिवसेना आणि भाजपच्या गोटातून सुरू झाला आहे. त्यामुळे बुथनिहाय आकडेवारी गोळा करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेताना दिसले. येथे खरी लढत ही भाजपचे संजय केळकर विरुद्ध मनसेचे अविनाश जाधव यांच्यात आहे.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे ५६.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये एकूण ३ लाख २२ हजार १६८ मतदारांपैकी १ लाख ८२ हजार २३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ८२ हजार ८०६ पुरुष आणि ९९ हजार ४२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे पुरुष मतदात्यांच्या तुलनेत १६ हजार ६२१ अधिक महिलांनी मतदान केले आहे. यंदा या मतदारांची संख्या ३ लाख ३७ हजार ९०९ एवढी होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्यादेखील वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, या निवडणुकीत यंदा ५२.४७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत ४.०९ टक्के मतदानात घट झाली आहे. यावेळी एकूण मतदारांपैकी ९७ हजार ७०० पुरुष तर ७९ हजार ५०० महिलांनी अशा एकूण १ लाख ७७ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
एकूणच मागील निवडणुकीपेक्षा कमी झालेल्या टक्केवारीची अनेक कारणे आता पुढे आली आहेत. एकतर हा मतदारसंघ सुशिक्षित, संस्कृत मतदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या मतदारसंघात कमी मतदान झाले. याचाच अर्थ या ठिकाणी विद्यमान आमदार मतदारांच्या पंसतीस न उतरल्याने किंवा त्याच्याकडून कामे झाली नसल्याने किंवा या मतदारसंघातील वाहतूककोंडी, जुन्या इमारतींचा प्रश्न, अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आदींच्या समस्या सुटलेल्या नसाव्यात म्हणूनच कदाचित मतदार राजा कमी प्रमाणात उतरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, दुसरीकडे सक्षम पर्याय म्हणूनही अविनाश जाधव यांना कदाचित पसंती नसल्याचे कारण पुढे आले असून विद्यमान आणि पर्याय हे दोघेही अयोग्य वाटत असल्याने कदाचित मतदानाची टक्केवारी घटली असावी असाही आता कयास लावला जात आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीने मनसेला टाळी दिली असली तरी राष्ट्रवादीला मानणारा मतदार मतदानासाठी कमी संख्येने उतरला असावा अशी चर्चा आहे. तर काँग्रेस एक वेळेस राष्ट्रवादीला मतदान करू शकते. मात्र ऐन वेळेस श्रेष्ठींनी मनसेला आतून टाळी दिली आणि अचानकपणे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना इंजिनाला मतदान करा, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, पंजाच या निवडणुकीत नसल्याने इंजिनाला मतदान कसे करायचे असा पेच अनेक सर्वसामान्य मतदारांना सतावला होता. त्यामुळेच याचाही फटका बसून टक्केवारी घसरली असावी, असेही आता बोलले जात आहे. एकूणच आता घटलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार, केळकर विधानसभेचा सेंकड पार्ट लिहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.