ठाणे - सुशिक्षित आणि दोन महापालिका कार्यक्षेत्रात विभागलेल्या ओवळा-माजिवडा या मतदारसंघात यावर्षी मतदानाची टक्केवारी तब्बल आठ टक्क्यांनी घसरली आहे. मागील दोन निवडणुकीपेक्षा ती मोठ्या प्रमाणात घसरल्याने येथील मतदारांमधील निरुत्साह प्रामुख्याने पाहण्यास मिळत आहे. यामुळे या घसरलेल्या टक्केवारीचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहणेजोगे ठरणार आहे.ठाणे आणि मीरा-भार्इंदर या दोन महापालिकांच्या कार्यक्षेत्रात विभागलेल्या ओवळा-माजिवड्यात शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि मनसे अशी लढत होती. या मतदारसंघात शिवसेनेने दहा वर्षांत केलेल्या कामांवर ही निवडणूक लढवली. त्यातच, काँग्रेसने स्थानिक मुद्दयांसह पाणी समस्या आणि वाहतूककोंडी हे मुद्दे हाती घेतले होते. तर मनसेने या मतदारसंघात दहा वर्षांत न झालेल्या कामांसह नसलेले महाविद्यालय, रुग्णालय आदी मुद्दे हाती घेतले. प्रचारकाळात या मतदारसंघात एका ही मोठ्या राजकीय नेत्याची सभा झालेली नाही.काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची मीरा-भार्ईंदर येथे दोन मतदारसंघासाठी सभा घेतली होती. दुसरीकडे येथे यंदा मतदारांची संख्या वाढल्याने मतदान वाढेल असे वाटले होते. पण, २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा यावर्षी ते ८ टक्क्यांनी घसरले आहे. त्यातून या घसरलेली टक्केवारीचा फायदा नेमका कोणाला होईल, किंवा वाढलेले मतदार नेमकी शिवसेनच्या पदरात पडता की मनसे आणि काँग्रेसच्या खात्यात जातात हे गुरवारी दिसेल. यावर्षी ओवळा-माजिवडा मतदारसंघात मतदारांना बाहेर करण्यातही अपयश आल्याचे या आकडेवारी स्पष्ट दिसत आहे.या मतदारसंघात एकूण चार लाख ४९ हजार ६०२ इतक्या मतदारांमध्ये २ लाख ४४ हजार ८९८ इतके पुरुष तर २ लाख ४ हजार ६९३ महिला आणि अवघे ११ इतर मतदारांचा समावेश होता. त्यापैकी १ लाख १० हजार १६४ पुरुष तर ८३ हजार ४६ महिला आणि २ इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. असा एकूण १ लाख ९३ हजार २१२ मतदारांनी केलेल्या मतदानामुळे या मतदारसंघात ४२.९७ टक्के इतके मतदान झाले आहे. ही आकडेवारी गतवर्षांच्या नाहीतर २००९ च्या तुलनेपेक्षाही कमी झाल्याने ती नाराजी शिवसेनाला किंवा मनसे व काँग्रेसला भोवते ते गुरुवारी दिसेल.
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ओवळा-माजिवड्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने वाढवले उमेदवारांचे टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 7:48 PM