महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ठाणे जिल्ह्यात 13 मतदारसंघाची मतदानात घसरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 09:41 PM2019-10-22T21:41:51+5:302019-10-22T21:45:28+5:30
राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते.
- नारायण जाधव
ठाणे : राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून येथील एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीत दिवसेंदिवस घट होतांना दिसत आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून पथनाटय़, मॅरेथॉन स्पर्धासह चित्रकला, स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांद्वारे जनजागृती केली. मात्र, तरीही यंदाही जिल्ह्यातील 18 पैकी 13 मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 2014 च्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घटले आहे.
अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाशी तुलना केली तरी विधानसभेकरिता मतदानात दीड टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 8.96 टक्क्यांची घसरगुंडी ऐरोली मतदारसंघात झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत सर्वात कमी घट शहापूर मतदारसंघात 0.90 टक्के आहे. विशेष म्हणजे सर्वच मतदारसंघात गेल्या खेपेपेक्षा मतदारांची संख्या वाढूनही मतदानाच्या टक्केवारीत ही गंभीर घट झाली आहे. जिल्ह्यात मतदानात वाढ झालेल्या पाच मतदारसंघात सर्वात चांगली वाढ उल्हासनगरात 8.67 टक्के इतकी आहे.
जिल्ह्यात बहुभाषिकतेसह उत्तुंग इमारतींचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणा:या ओवळा-माजीवडय़ातही गेल्या वेळच्या तुलनेत 7.34 टक्के तर भिवंडी ग्रामीण सारख्या निमशहरी पट्टय़ातही ती 6.64 टक्के इतकी झाली आहे. डोंबिवली, बेलापूर, मुरबाड, मीरा-भाईंदर सारख्या मतदारसंघातही तिने गेल्या वेळेपेक्षा चार टक्क्याहून अधिकची घसरगुंडी नोंदविली आहे.
जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा मुंब्रा या पाच मतदारसंघातील मतदान तेवढे वाढले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात एक लाख पाच हजार 610 मतदारांची वाढ होऊन विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 63 लाख 29 हजार मतदारांची नोंद झाली होती. यातून 60 ते 65 टक्के मतदानाची अपेक्षा जिल्हा प्रशासाने व्यक्त केली होती.
मात्र, सलग तीन दिवस आलेली सुटी, मतदारांचे झालेल स्थलांतर ही प्रमुख कारण मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या घसरणीमागे असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. यात ऐरोलीत माथाडी कामगार, कल्याण-डोबिवलीत औद्योगिक तर भिवंडीत लूम कामगारांनी स्थलांतर केल्याने टक्का घसरल्याचा दावा जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्हा -एकूण जागा -18
घट 13 मतदारसंघ
वाढ 5 मतदारसंघ
मतदारसंघ 2014 2019 घट/वाढ
134 भिवंडी ग्रामीण 66.24 59.60 6.64 टक्के घट
135 शहापूर . 65.70 64.80 0.90 टक्के घट
136 भिवंडी पश्चिम 49.58 50.32 0.74 टक्के वाढ
137 भिवंडी पूर्व 44.30 47.81 3.51 टक्के वाढ
138 कल्याण पश्चिम 44.92 41.74 3.18 टक्के घट
139 मुरबाड 63.17 58.36 4.81 टक्के घट
140 अंबरनाथ 39.71 42.32 2.61 टक्के वाढ
141 उल्हासनगर 38.22 46.89 8.67 टक्के वाढ
142 कल्याण पूर्व 45.19 43.55 1.64 टक्के घट
143 डोंबिवली 44.74 40.72 4.02 टक्के घट
144 कल्याण ग्रामीण 47.94 46.37 1.57 टक्के घट
145 मीरा-भाईंदर 52.66 48.38 4.28 टक्के घट
146 ओवळा-माजीवडा 50.31 42.97 7.34 टक्के घट
147 कोपरी-पाचपाखाडी 53.10 49.09 4.0 टक्के घट
148 ठाणे 56.56 52.47 4.09 टक्के घट
149 मुंब्रा-कळवा 47.48 49.96 2.48 टक्के वाढ
150 ऐरोली 51.47 42.51 8.96 टक्के घट
151 बेलापूर 49.69 45.16 4.53 टक्के घट