गृहकर्जाच्या नावाखाली ठाण्यातील नोकरादाराची साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:06 PM2017-12-01T15:06:31+5:302017-12-01T15:11:38+5:30
ठाण्यातील कळवा भागातील एका रहिवाशास १८ लाख रुपये गृहकर्जाची आवश्यकता होती. नाशिक येथील एका आरोपीने गृहकर्जासाठी साडेतीन लाख रुपये बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितले. नंतर हा पैसा आरोपीने काढून घेतला. आता या रहिवाशाला गृहकर्ज तर मिळालेच नाही, शिवाय जवळचे साडेतीन लाख रुपये हातचे गेले आहेत.
ठाणे : १८ लाख रुपयांचे गृहकर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका नोकरदाराची साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. नौपाडा पोलीस या आरोपीच्या शोधात आहेत.
ठाण्यातील कळवा येथील पारसिक नगरातील चिनार अपार्टमेंटचे रहिवासी विनायक रमेश पालव (वय ३८) हे ठाण्यातीलच एका प्रतिष्ठित सराफा व्यावसायिकाकडे नोकरी करतात. याच सराफा व्यावसायिकाकडे नोकरी करणाºया त्यांच्या एका सहकाºयाकडे पालव यांनी घर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्याकडे थोडीफार रोकड आहे, थोडेफार कर्ज मिळाल्यास घराची समस्या सुटू शकेल, असे त्यांनी या सहकाºयाला सांगितले. यातूनच या सहकाºयाचा भाऊ प्रविण गोरखनाथ वाघचोरे याच्याशी पालव यांचा परिचय झाला. बँकेत आपली चांगली ओळख असल्याचे वाघचोरे याने त्यांना सांगितले. बँकेकडून १८ लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज आपण मंजुर करून घेऊ शकतो, असे आमिष आरोपी वाघचोरे याने दाखवले. त्यासाठी तीन लाख ५0 हजार रुपयांची मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) बँकेत भरण्याची अट त्याने पालव यांना घातली. मुदत ठेवीसाठी आरोपीने त्यांना एका बँकेचा खाते क्रमांकही दिला. गृहकर्ज मिळेल या आशेने पालव यांनी पैशाची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली. सप्टेंबर २0१६ ते जानेवारी २0१७ या कालावधीत आरोपीने दिलेल्या बँक खात्यामध्ये पालव यांनी टप्प्या-टप्प्याने तीन लाख ५0 हजार रुपयांचा भरणा केला. आरोपीने सांगितल्याप्रमाणे पूर्ण पैशाचा भरणा केल्यानंतर पालव यांनी गृहकर्जाबाबत विचारणा केली. सुरूवातीला आरोपीने पालव यांना ढकला-ढकलीची उत्तरे देऊन वेळ मारून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने पालव यांना टाळण्यास सुरूवात केली. शेवटी आरोपीने फोन उचलणे पुरते बंद केल्यानंतर पालव यांना शंका आली. त्यांनी मुदत ठेव जमा केलेले बँक खाते तपासले असता, त्यातून संपूर्ण रक्कम काढून घेतली असल्याचे पालव यांना समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालव यांनी ३0 नोव्हेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत ओऊळकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी प्रविण वाघचोरे हा नाशिक येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याचा शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.