ठाणे : कोरोनाच्या आड मनोहर डुंबरे यांनी पातलीपाडा येथे अन्नछत्राची जागादेखील हडप केली असल्याचा गंभीर आरोप आता महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. परंतु, महापौर खोटे आरोप करीत असून मी कोणत्याही प्रकारचा अर्ज लस घेण्यासाठी केला नसल्याची माहिती डुंबरे यांनी दिली. तसे असेल तर मी नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले.
- आमदार पुत्राला दिला लसीचा लाभ
महापौर नरेश म्हस्के यांच्या समवेत शिवसेना आमदार रवींद्र फाटक आणि त्यांच्या लहान मुलानेदेखील कोरोनाची लस घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यासंदर्भात फाटक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतला नाही.
- नगरसेवकांच्या लसीकरणावर महापालिकेचे मौन
एकीकडे लसीवरून राजकारण तापले असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या १० ते १५ लोकप्रतिनिधींनीदेखील कोरोनाची लस घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाला छेडले असता, त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य करता येणार नसल्याचे सांगून काढता पाय घेतला आहे.