ठाणे - ठाणे शहरातील अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन ठाणे महापालिकेने आजी - माजी सहाय्यक आयुक्तांना नोटीस बजावल्याची घटना ताजी असतांनाच नऊ प्रभाग समितीत मागील कित्येक वर्ष तळ ठोकून बसलेल्या तब्बल १७० कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या ८५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनाधिकृत बांधकामांना पाठीशी घालणे या कर्मचाऱ्यांना भोवले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
मागील दोन ते तीन महिन्यापासून ठाणे महापालिका हद्दीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. स्थायी समिती आणि महासभेत देखील नगरसेवकांनी या मुद्याला हात घातला होता. त्यानुसार सहाय्यक आयुक्तांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील लावून धरण्यात आली होती. याशिवाय काही प्रभाग समितीमध्ये मागील कित्येक वर्षे तळ ठोकून बसलेल्या कर्मचा:यांची बदली देखील करण्याची मागणी करण्यात आली होती. तर काही कर्मचाऱ्यांची बदली करुन देखील ते इतर ठिकाणी हजर झाले नसल्याचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला होता.
अखेर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कर्मचाऱ्यापासून ते थेट अधिकाऱ्यापर्यंत बदलीचे हत्यार आपल्या हातात घेतले आणि अगदी काही दिवसातच त्यांनी नऊ प्रभाग समितीत मागील कित्येक वर्ष कार्यरत असलेले बिगारी, सफाई कामगार, लिपीक, करवसुली विभाग, बिट निरिक्षक, मुकादम, शिपाई, अशा सर्वांच्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना आता सोमवार पासून आपल्या बदली ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. शिवाय हजर न राहिल्यास त्यांची सेवा विनावेतन धरण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
९ प्रभाग समितीमधील ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती अंतर्गत अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या तब्बल ८५ कर्मचाऱ्यांच्याच म्हणजेच १०० टक्के बदल्या करण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन या बदल्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.