सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील चौकाच्या नामांतरावरून सिंधी- मराठी वाद उभा ठाकला असून यातून मार्ग काढण्यासाठी थेट विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्या कक्षात बैठक झाली. बैठकीला माजी उपमहापौर जया साधवानी, आयुक्त डॉ राजानिधी यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते. समन्वयाने मार्ग काढण्याच्या सूचना यावेळी विधानसभा अध्यक्ष पाटोले यांनी दिल्याची माहिती जया साधवानी यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं- ५ येथील नेताजी चौकाचे नामकरण धर्मवीर आनंद दिघे असे झाले. महापालिका महासभेत तसा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र कालांतराने चौकाचे नामांतरण साई गुरुमुखदास ठेवण्याचा ठराव येऊन मंजूर झाला. यावेळी काही नगरसेवकांनी चौकाचे नामांतरण धर्मवीर आनंद दिघे असे झाल्याची आठवण करून दिली. त्यावेळी चौकाचे नामांतर यापूर्वी झाले असेलतर, दुसरा नामांतराचा ठराव रद्द होईल. असे सांगण्यात आले. मात्र कालांतराने चौकाच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर येऊन सिंधी-मराठी वाद निर्माण झाल्याचे चित्र शहरात उभे ठाकले. मनसेने चौकाचे नाव धर्मवीर आनंद दिघे राहणार असून चौकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी होऊ लागली. चौकाचा वाद चिघळू नये, म्हणून काँग्रेस पक्षाच्या नेत्या व माजी उपमहापौर जया साधवानी यांनी वारिष्टकडे दाद मागितली. तेव्हा विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्या दालनात बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी बैठक बोलाविली.
विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांच्या दालनात बोलाविलेल्या बैठकीला जया साधवानी, ओमी साई, जेसा मोटवानी, महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, नगररचनाकार अरुण गुडगुडे, सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे आदीजन उपस्थित होते. सर्वांचे म्हणणे ऐकल्यावर अध्यक्ष नाना पाटोले यांनी चौकाच्या नामांतराचा प्रश्न सर्वपक्षीय नेत्यांनी समन्वय साधून सोडविण्याची विनंती केली. धर्मवीर आनंद दिघे व साई गुरुमुखदास दोन्ही आदर्श असून नामांतरा बाबतचा योग्य निर्णय महापालिका प्रशासन घेणार असल्याचे प्रतिक्रिया जया साधवानी यांनी दिली. नामांतराच्या वादामुळे सर्वात मोट्या चौकाचे सुशोभीकरण व नुतनीकरण लटकले. अशी टीका सर्वस्तरातून हित आहे.
आनंद दिघे यांच्या नावावर मनसे-शिवसेना आक्रमक
नेताजी चौकाचे नामांतर धर्मवीर आनंद दिघे असे यापूर्वी झाले असून चौकाला आनंद दिघे यांचे नाव द्यावे. यासाठी मनसे आक्रमक झाली. तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिघे यांच्या चौक नामांतरणावर आग्रही भूमिका घेऊन चौकाचे नामांतरण आनंद दिघे यांच्या नावाने होणार असल्याचे चौधरी म्हणाले.