- राजू काळे
भाईंदर - आंबेडकर नगरमध्ये राहणारी एक तरुणी गोराई बीचवर आत्महत्या करायला गेली होती. गोराई बीचवर आत्महत्या करायला गेलेल्या या तरूणीला जीवरक्षकासह सागरी पोलिसांनी वाचवलं. जीवरक्षक गजानन कुराडे व सागरी पोलीस कर्मचारी बाजीराव रहाणे, आतिष सातपुते यांनी तीला सुखरुप किनाऱ्यावर आणलं. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली.
भार्इंदर पश्चिमेकडील आंबेडकर नगरमध्ये राहणारी एक २५ वर्षीय तरुणी बुधवारी आपल्या मित्रासोबत बाईकवरुन गोराई बीचवर फिरावयास गेली होती. सायंकाळच्या सुमारास समुद्राला ओहोटी येऊ लागली. त्यातच किनाऱ्यावर काळोख पसरु लागताच ती तरुणी बाईकवरुन उतरुन थेट समुद्राच्या दिशेने जाऊ लागली. ती बाब तीच्या मित्राच्या निदर्शनास आल्याने त्याने तीला आवाज देत थांबण्यास सांगितले. परंतु, तीने आपण आत्महत्या करण्यास जात असल्याचे त्याला सांगताच त्याची पाचावर धारण बसली. त्याने मदतीसाठी किनाऱ्यावरच आरडाओरड सुरु केली. त्यावेळी तेथे गोराई सागरी पोलिस ठाण्याचे गस्तीवर असलेले रहाणे, सातपुते व मुंबई
महापालिकेचे कंत्राटी जीवरक्षक गजानन यांनी त्या तरुणीला वाचविण्यासाठी समुद्राच्या दिशेने धाव घेतली. तिला वाचवून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर तिला गोराई पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आलं. तिथे तीने आपण गंमत म्हणून आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे उडावाउडवीचे उत्तर दिल्याचे सुत्राकडून सांगण्यात आलं. चौकशीनंतर त्या तरुणीला सोडून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. याप्रकरणी गोराई पोलिसांना संपर्क साधला असता त्यामागचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.