महापौर डिंपल मेहता यांचा नाट्यगृहाची परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 04:33 PM2017-12-01T16:33:18+5:302017-12-01T16:33:27+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेला आरजी (रिक्रीएशन ग्राऊंड) च्या माध्यमातून मिळालेल्या जागेवर आ. प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार एकमेव नाट्यगृह बांधण्यासाठी प्रशासनाने अलिकडेच दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याचाच प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर डिंपल मेहता यांनी येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत आणला आहे.
- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेला आरजी (रिक्रीएशन ग्राऊंड) च्या माध्यमातून मिळालेल्या जागेवर आ. प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार एकमेव नाट्यगृह बांधण्यासाठी प्रशासनाने अलिकडेच दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याचाच प्रस्ताव दस्तुरखुद्द महापौर डिंपल मेहता यांनी येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत आणला आहे. यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून महापौरांनी बहुमताच्या जोरावर परवानगी रद्द केल्यास त्यांना रस्त्यावरच फिरु देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
यामुळे ८ डिसेंबरची महासभा वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ३० आॅगस्ट २०१५ रोजी नाट्यगृहाच्या भूमिपूजनावेळी सुद्धा सत्ताधारी युतीतील भाजपाने भूमीपूजन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शिवसेनेने माती चारली होती. त्यावेळपासून भाजपा-सेनेत राजकीय श्रेयाच्या नाट्याला सुरुवात झाली. त्याचा प्रत्यय दुस-यांदा एकमेव क्रीडासंकुलासह ठिकठिकाणच्या उद्यानांच्या उद्घाटनावेळी आला. पालिकेने दहिसर चेकनाका परिसरात डिबी रिअॅल्टी या विकासक कंपनीला मौजे महाजन वाडी येथे भव्य गृहप्रकल्प बांधण्याची परवानगी ७ वर्षांपुर्वी दिली. त्यापोटी विकासकाने पालिकेला आरजीच्या माध्यमातुन सुमारे ७ हजार चौमी जागा नाट्यगृहासाठी दिली आहे. तत्पुर्वी ती जागा गिळंकृत करण्याचा डाव विकासकाने पालिकेतील भ्रष्ट अधिका-यांच्या संगनमताने साधला होता. हा डाव हाणून पाडत आ. प्रताप सरनाईक यांनी ती जागा पालिकेला मिळावी व त्यावर नाट्यगृह बांधले जावे, यासाठी गेल्या ६ वर्षांपासुन पालिकेकडे पाठपुरावा केला होता. परंतु, प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवुन वेळ मारुन नेत नागरीकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा कारभार चालविला होता. अखेर सरनाईक यांनी २०१४ मध्ये तत्कालिन आयुक्त सुभाष लाखे यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन छेडून प्रशासनाला विकासकाची बांधकाम परवानगीच रद्द करण्यास भाग पाडले. परवानगी रद्द होण्याच्या भितीपोटी विकासकाने सुमारे ७ हजार चौमी जागेपैकी ४ हजार ८०० चौमी जागा पालिकेच्या ताब्यात दिली. त्यावर सुमारे १२०० आसनक्षमता असलेले तीन मजली भव्य व सुसज्ज नाट्यगृह तसेच सुमारे १५० आसनक्षमता असलेले मिनी थिएटर बांधण्यात येणार आहे. परंतु, विकासकाने त्याला विलंब लावल्याने अखेर संतापलेल्या सरनाईकांनी १७ नोव्हेंबरला पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या पालिकेतील वरीष्ठ अधिका-यांसोबत त्या जागेची पाहणी केली. त्यावेळी विकासकाला नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे निर्देश देत प्रशासनाला त्यासाठी बांधकाम परवानगी देण्याची सूचना केली. त्याला आयुक्तांनी मान्यता देत डिसेंबर २०१८ पर्यंत नाट्यगृह बांधण्याचे आश्वासन दिले. पालिकेने अलिकडेच विकासकाला नाट्यगृहाच्या बांधकामाला परवानगी दिल्याने त्याचे काम जोरात सुरु असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, गेल्या सात वर्षांपासुन पालिकेने विकासकाला केवळ नाट्यगृह बांधण्याच्या परवानग्या देऊन वेळ मारुन नेल्याने रेंगाळलेल्या नाट्यगृहाची जागा पालिकेला दिल्यास त्यावर इतर लोकाभिमुख विकासकामे करता येणे शक्य होणार असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. त्यामुळे पालिकेने नाट्यगृहाला दिलेली परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव येत्या ८ डिसेंबरच्या महासभेत त्यांनी आणल्याचे सांगितले जात आहे.
- महापौर, भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या हाताखालच्या बाहुल्या आहेत. नरेंद्र मेहता यांच्या तालावर नाचून त्यांनी नाट्यगृहाची परवानगी रद्द करण्याचा उपद्व्याप सुरु केला आहे. महापौरांसह भाजपा आमदाराने कितीही प्रयत्न केला तरी ते नाट्यगृहाचे बांधकाम थांबवु शकणार नाहीत. त्यांनी शहरातील सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न चालविला असुन तसे झाल्यास त्याला सर्वस्वी महापौरच जबाबदार राहतील.
- शिवसेना आ. प्रताप सरनाईक