महापौरांनी केली कारिवली रस्त्याची पाहणी; अधिकाऱ्यांसह उतरल्या रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:41 AM2019-12-12T00:41:40+5:302019-12-12T00:42:18+5:30
अभियंते आणि ठेकेदार यांना जलदगतीने रस्त्याचे काम उरकून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या.
भिवंडी : शहराच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यावर त्यांनी मंगळवारी कारिवली नाका ते सुभाषनगर पोलीस चौकी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या निधीतून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराकडून या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे नागरिकांनी महापौरांकडे तक्रारी केल्याने त्याची दखल घेऊन बांधकाम अधिकाऱ्यांसह त्यांनी कामकाजाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी अभियंते आणि ठेकेदार यांना जलदगतीने रस्त्याचे काम उरकून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक सिराज ताहीर मोमीन, कोणार्कविकास आघाडीचे युवानेते मयूरेश पाटील, एमएमआरडीएचे तांत्रिक सलागार संतोष नाईक, पालिका कनिष्ठ अभियंता सचिन नाईक, हरीष म्हात्रे उपस्थित होते.
हा रस्ता ७०० मीटर लांब तर ६९ फूट रुंद होणार असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होताच नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शहरात येणाºया प्रमुख रस्त्यांपैकी हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून शहरवासीयांसह ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत. शहरात सध्या १५ हून अधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये कारिवली रस्त्याचाही समावेश आहे. या कामाची पाहणी करून महापौर प्रतिभा पाटील यांनी कामाची पाहणी करून हे काम विहित मुदतीत चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित पालिका अधिकाºयांना दिल्या आहेत.