बालकांना विकणारी टोळी जेरबंद! ६ महिलांचा समावेश, दोन बालकांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 04:59 AM2017-09-27T04:59:53+5:302017-09-27T05:00:00+5:30
गोर-गरीब महिलांना नको असलेली नवजात बालके श्रीमंतांना विकणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. या प्रकरणी सहा महिलांसह आठ आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून दोन बालकांची सुटका केली आहे.
ठाणे : गोर-गरीब महिलांना नको असलेली नवजात बालके श्रीमंतांना विकणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. या प्रकरणी सहा महिलांसह आठ आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून दोन बालकांची सुटका केली आहे.
अनैतिक संबंध किंवा अत्याचारातून जन्माला आलेले बाळ संबंधित महिलेला विकायचे असल्यास, त्याची व्यवस्था करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर काही दिवस पाळत ठेवली. चौकशी केली असता सोलापूर येथील राखी रणधीर बाबरे ही या टोळीची सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या महिलेने गरजू महिला हेरण्यासाठी झोपडपट्टी भागांमध्ये हस्तक नेमले होते. तसेच राखी बाबरे ही स्वत: यासाठी कंत्राटी पद्धतीने मातृत्व (सरोगसी) स्वीकारत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. तसेच गरजू शोधण्यासाठी सरोगसीवर उपचार करणाºया हॉस्पिटल्समध्येही आरोपीने हस्तक तयार केले होते.
पोलिसांनी या प्रकरणी राखीसह हरजिंदर धरमसिंग गिल, कावेरी राज दास, नीलम अनिल सिरसाट, मोहिनी किरण गायकवाड, जनाबाई शेषराव खोतकर, मंगल बाळासाहेब
सुपेकर आणि संतोष रामदास गायकवाड यांना अटक केली. तर
एक आणि सहा महिन्यांची
दोन नवजात बालके विकण्याच्या तयारीत आरोपी असताना पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही बालकांची व्यवस्था नेरूळ येथील बालसुधारगृहात केली आहे. आरोपींना ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सावत्र मुलाकडून अत्याचार
आरोपींपैकी एका महिलेवर सावत्र मुलाकडून अत्याचार करण्यात आला होता. यातून जन्माला आलेल्या बाळालाही विकण्याचा प्रयत्न आरोपीने केला. या टोळीमध्ये आणखी आरोपी असून, चौकशीअंती त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशी होती कार्यपद्धत
नवजात बालक एखाद्या महिलेला नको असल्यास, तिच्याशी संपर्क साधून पैशाचे आमिष दाखविण्याचे काम हे हस्तक करायचे. बालक विकण्यास महिला तयार झाली की, ते विकत घेणारा शोधून ही महिला मोठ्या प्रमाणात पैसे कमवित असल्याची माहिती तपासामध्ये समोर आले. बालकांची विक्री २ ते ५ लाख रुपयांमध्ये केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.