हॉटेलचालकांची लाखोंची बिले; ठामपाने आतापर्यंत केले ४० लाख अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:58 PM2020-12-26T23:58:24+5:302020-12-26T23:58:43+5:30
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची केली होती व्यवस्था
ठाणे : कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होऊ लागले आहे. परंतु, जेव्हा कोरोनाची महामारी सुरू होती, त्यावेळेस महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस व इतर अत्यावश्यक स्टाफसाठी शहरातील काही हॉटेल ताब्यात घेतले होते.
आता याच हॉटेलचालकांनी महापालिकेला लाखोंची बिले पाठवून झालेला खर्च परत मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेनेदेखील आतापर्यंत ४० लाखांची बिले अदा केली आहेत.
मार्चपासून महापालिकेने काही इमारती, शाळा, हॉस्पिटल व हॉटेल रुग्णांसाठी अधिगृहीत केली होती. परंतु, या ठिकाणी दाखल रुग्णांवर उपचारासाठी असलेल्या नर्स, डॉक्टर व इतर अत्यावश्यक स्टाफसाठीदेखील घरी जाणे मुश्कील होते. त्यांना रोजच्या रोज घरी जाणेही शक्य होत नव्हते. किंबहुना, सोसायटीत त्यांना घरी घेत नव्हते. अशा परिस्थितीत महापालिकेने जी हॉटेल ताब्यात घेतली होती, त्याठिकाणी त्यांची व्यवस्था केली होती.
ही व्यवस्था करताना रोजचा खर्च किती होणार, तो कोण करणार, असा पेचही निर्माण झाला होता. त्यामुळे तो महापालिका उचलेल, असे त्यावेळेस निश्चित झाले होते, अशी माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरूडकर यांनी दिली. त्यानुसार, आता शहरातील त्या आठ रुग्णालयांनी लाखोंची बिले पालिकेला धाडली आहेत. यामध्ये एका पंचतारांकित हॉटेलने तर चक्क ५ ते २० लाखांहून अधिकचे बिल धाडले आहे. त्यामध्ये रोजचा खर्च किती, रूमचे भाडे किती, याचा कोणताही उल्लेख केला नसल्याचेच दिसत आहे.