भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या कर आकारणीसाठी मुळ कागदपत्रात खाडाखोड करुन खोटी कागदपत्रे सादर करुन पालिकेची फडवणूक करणाऱ्याविरोधात काशिमिरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो अधिक चौकशीसाठी भार्इंदर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, त्यातील आरोपी रामचंद्र गुणाजी वणकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पालिका हद्दीतील चेणे गावात मनोज अर्जुन नडगे यांच्या मालकीची जागा सर्व्हे क्रमांक ४० पै २ वर आहे. त्यावर २००५ पासुन सुमारे ९०० चौरस फुट बांधकामाचे अतिक्रमण रामचंद्र वणकर यांनी केले आहे. ती जागा त्यांनी अफजल सलीम खामकर यांच्याकडून विकत घेतल्याचे त्यांनी पालिकेला सादर केलेल्या साठे करारात नमुद केले आहे. हि जागा अधिकृत करण्याच्या उद्देशाने त्यांनी २००५ मध्ये पालिकेकडे कर आकारणीसाठी अर्ज केला. त्यावेळी कार्यरत असलेले कर संकलक विजय पाटील (निवृत्त) व लिपिक प्रमोद पाटील यांनी सादर केलेल्या अर्जासह कागदपत्रांच्या आधारे रामचंद्र यांच्या अतिक्रमित जागेला कर आकारणी सुरु केली. मात्र रामचंद्र यांनी आपल्या जागेवर अतिक्रमण केले असुन त्यांनी त्याच्या कर आकारणीसाठी सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याबाबत जागा मालक मनोज यांनी पालिकेकडे सतत पाठपुरावा केला. मात्र काही निगरगट्ट अधिकाऱ्यांनी मनोज यांच्या पाठपुराव्याची दखल न घेता त्यांचा तक्रार अर्ज फेटाळून लावला. अखेर मनोज यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी पालिकेच्या कर विभागाकडे पुन्हा तक्रार अर्ज केला. त्याची दखल घेत कर निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी रामचंद्र यांना जागेची मुळ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी जागेच्या साठे कराराची झेरॉक्स प्रत कांबळे यांना सादर करुन मुळ कागदपत्रे सादर केली नाहीत. रामचंद्र यांनी त्यात कर आकारणीवेळी नमुद केलेला ३९ पै २ हा सर्व्हे क्रमांक खोडून त्या जागी ४० पै ३ हा सर्व्हे क्रमांक नमुद केला.दरम्यान सर्व्हे क्रमांक ४० पै २ हि जागा मनोज यांचीच असल्याचा निर्वाळा ठाणे भूमीअभिलेख विभागाने केलेल्या नकाशा सर्व्हेक्षणाद्वारे केला. यात रामचंद्र यांनी कागदपत्रांत खाडाखोड करुन अतिक्रमणावर कर आकारणी केल्याप्रकरणी कांबळे यांनी रामचंद्र यांच्या विरोधात काशिमिरा पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. तसेच रामचंद्र यांनी केलेले अतिक्रमण हटवुन अहवाल सादर करण्याचे आदेश पालिकेचे अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले असतानाही ते अद्याप हटविण्यात आले नसल्याचे मनोज यांनी सांगितले.