मीरा रोड - जनतेच्या पैशांनी नैनिताल व दार्जिलिंगच्या गेलेल्यांमध्ये भाजपाचे १७ तर शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेल्याची माहिती हाती आली आहे. तर प्रशासनाकडे मात्र दौ-यांवर गेलेल्या नगरसेवक व अधिकारी यांची माहिती विचारली असता अशी कोणती माहितीच संबंधित विभागाने दिली नसल्याचे जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.मीरा भार्इंदर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे १६ सदस्य असुन आयुक्त हे त्याचे अध्यक्ष आहेत. भाजपाच्या मीना कांगणे, निला सोन्स, डॉ. प्रीती पाटील, हेमा बेलानी, सुजाता पारधी, मनोज दुबे, सचीन म्हात्रे, गणेश भोईर, विनोद म्हात्रे व गणेश शेट्टी हे १० नगरसेवक सदस्य आहेत. शिवसेनेचे कमलेश भोईर, एलायस बांड्या व अनंत शिर्के तर काँग्रेसचे राजीव मेहरा व अमजद शेख हे नगरसेवक या समिती मध्ये आहेत.समितीच्या 12 एप्रिल रोजी नैनिताल, देहरादुन या पर्यटनस्थळीच्या दौ-यात काँग्रेसचे मेहरा व शेख तर भाजपाचे शेट्टी हे तिघे नगरसेवक गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेचे अधिकारी नागेश ईरकर, हंसराज मेश्राम आदींचा देखील दौरेबाजांमध्ये समावेश आहे. महिला बालकल्याणच्या दार्जिलिंग, गँगटोक येथील 11 एप्रिल रोजी गेलेल्या दौरयात भाजपाच्या शानु गोहिल, सीमा शाह, वंदना भावसार, नयना म्हात्रे, सुरेखा सोनार, वैशाली रकवी, दीपिका अरोरा, सुनिता भोईर शिवसेनेच्या अर्चना कदम, कुसुम गुप्ता या नगरसेविकांचा समावेश आहे. शिवायसोबत पालिकेचे गोविंद परब, दामोदर संख्ये व फ्रांसीस या अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.या दौ-याला काँग्रेसच्या सारा अक्रम, रुबिना शेख तर सेनेच्या हेलन गोविंद तर कौटुंबिक कारणामुळे भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे ह्या गेल्या नाहीत. भाजपाच्या रक्षा भुपतानी यांनी ऐन वेळी दौरा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले. सेनेच्या कुसुम यांनी तर दौरे रद्द करा म्हणून एकीकडे पत्र देत दुसरी कडे मात्र त्या दौ-यास गेल्या आहेत.तर पालिकेच्या खर्चातून हे दोन्ही दौरे गेले असताना दौऱ्यांवर गेलेल्यांची नावंच पालिकेकडे नसल्याचं उघड झालं आहे. जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी आपल्याकडे नावं नसल्याचे सांगत संबंधित अधिकारी यांनी देखील माहिती दिली नाही असे स्पष्ट केले आहे. एकीकडे भाजपाने नागरीकांवर करवाढीचा बोजा टाकला तर सेनेने करवाढीस विरोध केला. परंतु पर्यटनस्थळी जनतेच्या पैशांची उधळपट्टी करुन मौजमजा करण्यासाठी मात्र भाजपा व सेनेचे नगरसेवक एकत्र गेल्याने यांचा विरोध बेगडी आहे. पण मनसे या दौरेबाज नगरसेवकां विरुद्ध आंदोलन करणार असे शहरअध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी म्हटले आहे.
मीरा भाईंदर : भाजपा-सेनेचे नगरसेवक दार्जिलिंग व नैनिताल दौ-यावर, पालिकेला माहितीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 10:26 PM