मीरा-भार्इंदर महापालिकेने ३७ कंत्राटी संगणक चालकांची केली कपात; खर्चावरील पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 04:45 PM2018-02-09T16:45:48+5:302018-02-09T16:53:38+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ पासुन कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या ८२ पैकी ३७ संगणक चालकांना कामावरुन अचानक काढल्याने या कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.
राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ पासुन कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या ८२ पैकी ३७ संगणक चालकांना कामावरुन अचानक काढल्याने या कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र या कर्मचारी कपातीमागे पालिका आस्थापनेवर वाढलेल्या खर्चाला नियंत्रित करण्याचा पर्याय तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शोधल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे.
यापुर्वी सेवेत कायम करण्याच्या मागणीवरुन गेल्या १० वर्षांपासून ठोक मानधनावर काम करणाऱ्या ६८ संगणक चालक व लघुलेखकांनी २२ जानेवारीपासुन बेमुदत कामबंद आंदोलन छेडले होते. त्यांनी ५ फेब्रुवारीला आंदोलन मागे घेतल्याने प्रशासनाने पुन्हा त्यांची ठोक मानधनावर पुर्ननियुक्ती केली आहे. दरम्यान त्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी प्रशासनाने ३० कंत्राटी संगणक चालकांची गच्छंती केली होती. मात्र ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे न घेतल्याने त्याच दिवशी कंत्राटी संगणक चालकांची केलेली कपात मागे घेण्यात आली. यातील बहुतांशी संगणक चालक अतिरीक्त ठरत असल्याचा अहवाल तत्कालिन आस्थापना अधिक्षक चंद्रकांत बोरसे यांनी तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना डिसेंबर २०१७ मध्ये दिला होता. त्यात एकाच विभागात असलेले कंत्राटी संगणक चालक दुपटीहून अधिक असल्याने त्यांना कामावरुन कमी करण्यात यावे, अशी सुचना देखील करण्यात आली होती. परंतु, प्रशासनाने त्यावेळी त्याची दखल न घेता दोन महिन्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. पालिकेत संगणक चालकांची पदे मंजुर नसल्याने पालिकेने २००७ पासुन ठोक मानधनावर ९१ संगणक चालक व लघुलेखकांची नियुक्ती केली. काही वर्षांनी यातील २३ कर्मचाय््राांनी नोकरी सोडल्याने उर्वरीत ६८ संगणक चालकांकडुन पालिकेच्या वाढलेल्या कारभाराचा निपटारा अशक्य होऊ लागला. त्यामुळे पालिकेने २०१५ मध्ये बाह्य मार्गाने (आऊट सोर्सिंग) कंत्राटी पद्धतीवर संगणक चालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याची निविदा प्रक्रीया पुर्ण केल्यानंतर त्याचे कंत्राट गणेश कृपा ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आले. त्यानुसार प्रशासनाने ८२ कंत्राटी संगणक चालकांच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखविला. गेल्या तीन वर्षांपासुन कंत्राटावर काम करणारे संगणक चालक प्रशासनाला अतिरीक्त ठरू लागल्याने तत्कालिन आयुक्तांनी प्राप्त अहवालानुसार त्यांची कपात करण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले. त्यानुसार आस्थापना विभागाचे प्रमुख विजयकुमार म्हसाळ यांनी कंत्राटदाराला ८ फेब्रुवारीला ८२ पैकी ३७ कंत्राटी संगणक चालकांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले. कंत्राटदाराने त्या आदेशानुसार तब्बल ३९ कंत्राटी संगणक चालकांना कमी करण्यात येत असल्याची यादीच प्रशासनाला सादर केली. यावर गेल्या तीन वर्षांपासुन काम करणाऱ्या संगणक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाला खर्चच कमी करायचा होता तर त्यांनी विजेवर होणारी उधळपट्टी, बेकायदेशीरपणे लाटण्यात येणारा वाहन भत्ता, वारेमाप टक्केवारी आदी खर्चिक बाबींवर कात्री लावणे आवश्यक होते, तद्नंतरच कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबावा, अशी प्रतिक्रिया त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.