Bharat Bandh: भिवंडीत भारत बंदला समिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:53 PM2020-12-08T16:53:46+5:302020-12-08T16:53:53+5:30
भिवंडीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना देखील या बंद मध्ये सहभागी झाली होती .
- नितिन पंडीत
भिवंडी: केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी मंगळवारी देशातील विविध शेतकरी संघटनांसह भाजप व मित्रपक्ष वगळता सर्वपक्षीय भारत बंद आंदोलन करण्यात आला . या भारत बंदला भिवंडीत संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र मंगळवारी शहरात पाहायला मिळाले . सुरुवातीला सकाळी मंगलबाजार , वंजारपट्टी नाका , जकात नाका , बस स्टॅण्ड , कोटर गेट अशा शहरातील मुख्य ठिकाणी बंद पाळण्यात आला होता मात्र दुपारी एक वाजे नंतर सर्वत्र दुकाने उघडलेली पाहायला मिळाली . त्यामुळे भिवंडीत या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले . विशेष म्हणजे दुपारी शहरातील जवळपास सर्वच दुकाने उघडी दिसली तर प्रत्येक रिक्षा स्टँडवर रिक्षांसह वाहनांची वर्दळ दिसली .
भिवंडीत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना देखील या बंद मध्ये सहभागी झाली होती . केवळ भाजप व भाजप मित्र पक्षवगळता सर्वच राजकीय पक्षांनी याला बंदला साथ दिली असल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात येईल अशी चर्चा होती मात्र तसे चित्र आज पाहायला मिळाले नाही . सकाळी काही काळ बंद असलेली दुकाने दुपारी उघडण्यात आल्याने या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद दिसला. विशेष म्हणजे भारत बंद आंदोलनामुळे भिवंडीतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसेल अशी अपेक्षा असतांनाही धामणकर नाका तसेच कल्याण नाका व जकातनाका परिसरात चक्क वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर धामणकर नाका येथे रिक्षा चालकांची गर्दी व दुकाने उघडी दिसली. विशेष म्हणजे संमिश्र प्रतिसाद असला तरी शहरात सर्वत्र शांतात पाहायला मिळाली दरम्यान या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.