मनसे धावली पालकांच्या मदतीला, फीमध्ये मिळाली मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:21 AM2020-09-03T01:21:05+5:302020-09-03T01:21:26+5:30
चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्याचे पालकांना काही इग्रंजी माध्यमांच्या खाजगी शाळांनी सांगितले आणि ३१ आॅगस्टपर्यंत फी भरण्याचे तसे आदेशही दिले होते.
ठाणे : लोकमतने सोमवारच्या अंकात ‘खाजगी इंग्रजी शाळांकडून सक्तीने फीवसुली’ या मथळ््याअंतर्गत वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरस्वती विद्यालय, राबोडी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पालकांना प्रवेश फी आणि महिन्याची फी भरण्यासाठी आठवड्याभराची मुदत वाढ दिली आहे. या निर्णयाला पालकांनीही दुजोरा दिला असून इतर सुविधांच्या फीमध्ये मात्र ३० टक्के सवलत देण्याची त्यांची मागणी आहे. या वृत्ताची दखल घेत मनसेही या पालकांच्या मदतीला शाळेमध्ये पोहोचली. इतर सुविधांच्या फी बाबत येत्या ८ सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन, पालक, शिक्षण खात्यातील अधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यात बैठक होणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्याचे पालकांना काही इग्रंजी माध्यमांच्या खाजगी शाळांनी सांगितले आणि ३१ आॅगस्टपर्यंत फी भरण्याचे तसे आदेशही दिले होते. परंतू लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना फी भरणे शक्य नाही. त्यामुळे या फीमध्ये सवलत देण्यात यावी, त्यांना फी भरण्याचा अवधी वाढवून देण्यात यावा आणि प्रवेश फी व्यतिरिक्त इतर फी वसूल करण्यात येऊ नये अशी मागणी पालक प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापनाला केली. परंतू त्यांच्याकडे शाळा व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी मनसेकडे धाव घेतली. प्रवेश फी सह प्रयोगशाळा, क्रीडा, महिना फी, टर्म फी, वाचनालय, संगणक या इतर फी देखील भरण्याची सक्ती शाळा व्यवस्थापनाने केली. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी घरातूनच आॅनलाईन शिक्षण घेत आहेत. ते शाळेत गेलेच नसल्याने इतर फी का भरावी असा सवाल पालकांनी उपस्थित केला होता. सरस्वती विद्यालय, राबोडी या इंग्रजी शाळेच्या पालकांनीही आपल्या तक्रारी मनसेकडे नेल्या होत्या. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त प्रसिद्ध होताच सरस्वती विद्यालय, राबोडी या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवस्थापनाने पालकांना फी भरण्याची मुदत वाढ दिली आहे. प्रवेश फी आणि महिन्याची फी भरण्यासाठी आठवडा वाढवून दिला असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. तसेच, इतर सुविधांची फी संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर सुविधांची फी ७० टक्केच घेण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
सरस्वती विद्यालय, राबोडी या शाळेने प्रवेश फी आणि महिन्याच्या फीसाठी सोमवारी शेवटची तारीख दिली होती, त्यात मुदत वाढवून दिली आहे. तसेच, त्यांना जवळपास १० हजार रुपये भरायला सांगितले होते. आता ते ३६०० रुपयेच घेणार आहेत. इतर सुविधांच्या फीबाबत माझ्या पक्षाचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन, पालक आणि शिक्षण खात्यातील अधिकारी आठ दिवसांनी चर्चा करून निर्णय घेऊ. इतर सुविधांची ७० टक्केच फी शाळेने घ्यावी, असे आमचे मत आहे.
- अविनाश जाधव, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष, मनसे
पालकांची फी भरायची तयारी आहे. परंतु शाळांनी पालकांच्या सद्य: आर्थिक स्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य शासनाच्या नियमानुसार वापर न झालेल्या शैक्षणिक साधनांच्या उदा. संगणक लॅब, वाचनालय, क्रीडा फीसंदर्भात पुनर्विचार करावा. मनसेच्या मध्यस्थीने पालकांना दिलासा मिळाला, याचे समाधान आहे.
- संदीप पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनविसे
पालकांकडून गेल्यावर्षीची एक कोटी १० लाख रुपये इतकी फी येणे बाकी आहे. तेव्हा कोरोनाची परिस्थिती नव्हती. फी नाही आली तर शाळा कशी चालवावी? शाळेची देखभालदेखील होणे गरजेचे आहे. आठवड्याची मुदत देऊन प्रवेश फी आणि महिन्याची फी पालकांना भरण्यास सांगितले आहे. इतर सुविधांच्या फीबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ.
- मंजू मिश्रा, उपप्राचार्या,
सरस्वती विद्यालय, राबोडी