प्रदूषणावरून मनसेची धडक; मास्क घालून दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:20 AM2019-12-12T01:20:36+5:302019-12-12T01:21:11+5:30
प्रदूषण मंडळ कार्यालयात विचारला जाब
कल्याण : डोंबिवलीतील नागरिकांना बुधवारी सकाळी उग्र रासायनिक वासाचा त्रास सुरु झाल्यानंतर मनसेनेकल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. तोंडावर मास्क बांधून त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. तीन दिवसांत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन अधिकारी वर्गाकडून मनसेच्या शिष्टमंडळास दिले गेले असले तरी, तीन दिवस काय आठवडा घ्या, मात्र समस्या सुटली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मनसेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश कदम यांच्यासह मनसेचे गटनेते मंदार हळबे व पदाधिकारी प्रथमेश खरात, वेद पांडे, सचिन कस्तूर, विशाल बडे आणि हर्षल बडे यांनी प्रदूषण नियंत्रण कार्यालयास डोंबिवलीतील प्रदूषणप्रकरणी जाब विचारला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण कार्यालयातील प्रभारी प्रादेशिक अधिकारी एस. एल. वाघमारे, उपप्रादेशिक अधिकारी संजय भोसले हे कार्यालयात हजर नव्हते. ते बदलापूर येथील एका उद्योजक कार्यक्रमास गेले होते. त्याठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन येणार होते. त्यामुळे अधिकारी उपस्थित नसल्याने वाडा, मुरबाड, शहापूर परिसराचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजपूत यांनी मी डोंबिवली विभागाचे काम पाहत नसल्याचे सांगत, मनसेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्विकारले. राजपूत यांनी भोसले यांना मनसेचे शिष्टमंडळ आल्याची माहिती फोनवर दिली. भोसले यांनी तीन दिवसांत ही समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले.
यापूर्वीही खंबाळपाडा परिसर आणि भोईरवाडी विभागात प्रदुषणाचा त्रास नागरिकांना झाला. त्यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही नागरिकांना प्रदुषणाचा त्रास सुरुच आहे. त्यावेळी कारखानदारांची संघटना ‘कामा’च्या मते, प्रदूषण भंगारवाल्यांकडून केले जात आहे. रसायनमित्रित पिशव्या त्याठिकाणी धुतल्या जात असल्याने प्रदुषणाचा त्रास होत आहे. मात्र ही लंगडी सबब असल्याचा मुद्दा राजेश कदम यांनी उपस्थित केला. प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण करणाºया कंपन्यांविरोेधात कारवाई करीत नाही. कारखानदारांची पाठराखण करीत आहे. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रक्रिया न करता खंबाळपाडा नाल्याद्वारे खाडीत सोडले जाते, असा आरोप कदम यांनी केला.
कारवाई करा!
प्रदूषणाचा त्रास रात्री झाल्यास तेथे मंडळाचे अधिकारी पोहोचत नाहीत. दुसºया दिवशी पाहणीसाठी येतात. डोंबिवली विभागासाठी विशाल मुंडे व निलेश मोरवणकर हे फिल्ड आॅफिसर दिले आहेत. ते नागरिकांच्या तक्रारीनंतरही रात्री घटनास्थळी येत नसतील, तर त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार आहात, असा प्रश्नही त्यांनी केला. मुंडे व मोरवणकर या फिल्ड आॅफिसरचे नंबर डोंबिवली परिसरातील नागरिकांच्या माहितीसाठी फलकावर प्रसिद्ध करावेत, अशी मागणीही कदम यांनी यावेळी केली.