ठाणे : नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात व्हावे आणि तरुणांना याचा आनंद घेता यावा, यासाठी सरकारने लादलेल्या संचारबंदीच्या अटी ३१ डिसेंबरपुरत्या तरी शिथिल कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरून नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करू, असे उघड आव्हान मनसेने सरकारला दिले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने २१ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. त्यात राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मनपा क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु, तिला मनसेने विरोध केला आहे. अनेक तरुण व हौशी लोकांनी मनसेकडे नववर्षासाठी अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे. ती लक्षात घेता तसेच वर्षभर सण-उत्सव हे निर्बंधातच गेल्याने आता ३१ डिसेंबरला एका दिवसापुरते हे निर्बंध उठवावेत, अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
रात्रीच फिरल्यावर कोरोना होताे का?
दिवसा एकत्र फिरल्यावर कोरोना होत नाही आणि रात्रीचा संचार केल्यावरच तो होतो, हा कोणता शोध राज्य सरकारने लावला आहे, असा सवाल जाधव यांनी केला. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचा दावा करून ३१ डिसेंबरला रात्रीची संचारबंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.