डोंबिवलीत रस्त्यांवर पार्क होणा-या वाहनांवर आकारले जाणार पैसे? १० डिसेंबर रोजी फ प्रभाग समिती घेणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:43 PM2017-11-21T15:43:17+5:302017-11-21T15:48:25+5:30
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असतांनाच स्थानक परिसरात बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जाणा-या दुचाकींसह चारचाकी वाहनांवर तासाप्रमाणे पैसे आकारण्याचा प्रस्ताव १० डिसेंबरपर्यंत केडीएमसी प्रशासनाने प्रभाग समितीसमोर ठेवावा, त्यानूसार त्यावर चर्चा करण्यात येईल. त्यातून एक धोरणात्मक निर्णय घेण्याचा ठराव फ प्रभाग समितीच्या बैठकीत एकत्रितपणे मांडण्यात आला.
डोंबिवली: शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असतांनाच स्थानक परिसरात बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जाणा-या दुचाकींसह चारचाकी वाहनांवर तासाप्रमाणे पैसे आकारण्याचा प्रस्ताव १० डिसेंबरपर्यंत केडीएमसी प्रशासनाने प्रभाग समितीसमोर ठेवावा, त्यानूसार त्यावर चर्चा करण्यात येईल. त्यातून एक धोरणात्मक निर्णय घेण्याचा ठराव फ प्रभाग समितीच्या बैठकीत एकत्रितपणे मांडण्यात आला. याखेरीज गार्डन देखभाल, सारस्वत कॉलनी प्रभागाला आयएसओ मानांकन, चिमणी गल्लीतील महापालिकेचे वाहनतळ सुरु करणे संदर्भात आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
महापालिकेच्या उपइमारतीत मंगळवारी झालेल्या बैठकीला सभापती खुशबु चौधरी यांच्यासह नगरसेवक,स्थायीचे सदस्य राहुल दामले, संदीप पुराणिक, नगरसेवक निलेश म्हात्रे, विश्वदीप पवार, साई शेलार, सायली विचारे, प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते. तासाप्रमाणे दर आकारणे व फेरिवाला प्रश्न मार्गी लागण्यासाठी कायद्याला धरुन, नियमांचे कुठेही उल्लंघन न करता निश्चित धोरण सांगण्यात यावे त्यावर सर्वानूमते विचार व निर्णय घेण्यात येणार आहे.
१० डिसेंबर रोजी सर्व प्रभाग समिती सदस्यांना प्रशासनाने त्याचे सादरीकरण करावे. त्यात कुठले रस्ते असतील, कुठल्या रस्त्यांवर पी१ पी२ धोरण अवलंबले जाणार, त्यानूसार तासासाठी किती दर आकारणी करायची आदीं तांत्रिक बाबींवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तसेच फेरिवाले किती, कुठे, किती वेळासाठी बसणार, त्यासाठी त्यांना किती फी आकारली जाणार, त्यावर कोणाचे नियंत्रण असेल, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर काय कारवाई होणार या सर्व बाबींची कागदोपत्री सुस्पष्टता आल्यानंतरच तो ठराव महापौर आणि महासभेसमोर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग) सुभाष पाटील, नगररचना विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
* बाजीप्रभु चौकातील चिमणीगल्ली लगतचे महापालिकेचे वाहनतळ सुरु तरी कधी होणार? असा सवाल संदीप पुराणिक यांनी केला. ताबा मिळून महिने उलटले तरीही महापालिका प्रशासन कानाडोळा का करत आहे? ती सुविधा नागरिकांना दिल्यास सुमारे ३०० वाहनांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न सुटेल. मानपाडा तसेच फडके रोडवरील काही अंशी पार्किंग समस्या निकालात निघेल, महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्या उत्पन्नावर महापालिका पाणी का सोडत आहे असा सवालही त्यांनी केला. त्यावर मात्र पालिकेचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक गोष्टीत राजकारण का केले जाते असा सवालही पुराणिक यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केला.
* सारस्वत कॉलनीचा प्रभाग ७१ होणार आयएसओ : सभापती खुशबु चौधरी यांचा सारस्वत कॉलनीचा प्रभाग क्रमांक ७१ हा आयएसओ नामांकीत करण्याचा प्रस्तावाला सर्वानूमते मंजूरी देण्यात आली. आता तो प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी महासभेसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आयएसओ संदर्भातील नामांकनाच्या सर्व निकषांची पूर्तता करण्यात आल्याचा विश्वास चौधरींनी व्यक्त केला.
* गोग्रासवाडीमधील भाऊ काका गार्डनच्या स्वच्छता, माती टाकणे, आणि ड्रेनेजची झाकणे बसवणे या विषयावर नगरसेविका सायली विचारे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर प्रशासनाने सांगितले की, महापालिका क्षेत्रातील सर्वच गार्डनमध्ये या तक्रारी आहेत. त्यावर देखभाल करण्यासाठी टेंडर मागवण्यात आले होेते, परंतू त्यास प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा टेंडर रि कॉल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समस्या मार्गी लागतील असे सांगण्यात आले.