लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरात कोरोनाची लाट हळूहळू ओसरत आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ आहे. त्यापैकी ५६ होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णाची संख्या कमी झाल्याने अनेक कोविड सेंटर बंद ठेवले असले तरी रुग्णासाठी सेंटर सज्ज असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली.
उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेचे शहर असल्याने, कोरोना संसर्ग होण्याची भीती होती. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्यासाठी तडजोड न करता खासगी प्लॅटिनियम रुग्णालय दरमहा २० लाख रुपये भाड्याने घेतले. तसेच सरकारी प्रसूतिगृहाचे रूपांतर कोविड रुग्णालयामध्ये केले. यासह महापालिका शाळा, तहसील कार्यालयाची नवीन इमारत, आयटीआयची इमारत, रेडक्रॉस रुग्णालय आदींसह अन्य खासगी रुग्णालये तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर म्हणून सुरू केली. तसेच डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदींची भरती महापालिकेने केली. दिवसाला १०० पेक्षा जास्त निघणारी रुग्णसंख्या घटून आज सरासरी १० पेक्षा कमी निघत असल्याने, शहराला दिलासा मिळाला आहे. तसे रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी देऊन आठवड्याला ३ हजारापेक्षा जास्त चाचण्या घेतल्या जात असल्याचे त्या म्हणाल्या.
शहरात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असून सुरू केलेली अनेक कोविड सेंटर रुग्णांअभावी बंद करण्यात आल्याची माहिती डॉ. गारे यांनी दिली. सद्यस्थितीत प्लॅटिनियम कोविड रुग्णालय, कोविड रुग्णालयात रूपांतर केलेले सरकारी प्रसूतिगृह, तहसील कार्यालयाची नवीन इमारत, महापालिका शाळा क्र. २९ अशी कोविड रुग्णालय व सेंटर सुरू आहेत, तर इतर सुरू केलेले कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्याचे त्यांनी सांगितले. १९ रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच ३ रुग्णांवर शहराबाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-----------------------------
डॉक्टर, नर्स यांची संख्या केली कमी
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने, महापालिकेने रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदींची तात्पुरत्या स्वरूपात व मानधनावर भरती केली. दरम्यान, रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेने डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉयची संख्या कमी केली. रुग्ण व डॉक्टरसह अन्य कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था ठेकेदारांमार्फत सुरू ठेवली आहे.