शिक्षक दिन : शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच एमपीएससी उत्तीर्ण झालो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:46 AM2019-09-05T00:46:54+5:302019-09-05T00:47:21+5:30
पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आयुष्याला डॉ. आनंद पाटील गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे मिळाली कलाटणी
कल्याण : माझा जन्म शेतकरी कुटुंबातला असून वडील प्राध्यापक होते. माझ्या खोडकर स्वभावामुळे मी सहा वर्षांचा झाल्यावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शाळेत वडिलांनी मला दाखल केले. पहिली ते तिसरीपर्यंतच्या शाळेत असताना ढोले आणि पोखरकरबाई आम्हाला शिकवत होत्या. पोखरकरबार्इंनी त्यावेळी हात धरून ‘अ, आ, इ’ लिहायला शिकवले. ज्ञानमाता विद्यालय येथे सातवीमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तेथील शिक्षकांनी केलेल्या चांगल्या मार्गदर्शनामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो आहे. खऱ्या अर्थाने आयुष्याला ‘टर्निंग पॉइंट’ शाळेतच मिळाला आणि मी घडत गेलो, अशा शब्दांत कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या शाळेतील रहाणेसर, थोरातसर यांच्यामुळे दहावी बोर्डात ८७ टक्के गुण मिळाल्याने अकरावीमध्ये सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये वडीलच प्राध्यापक असल्याने माझ्या खोडकर स्वभावाला थोडा लगाम लागला. बारावीनंतर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये केमिकल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील स्टडी सर्कल येथे एमपीएससीसाठी प्रवेश घेतला. याठिकाणी असलेल्या डॉ. आनंद पाटील यांच्यामुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. एमपीएससीसाठी संस्कृत आणि अकाउंट हा विषय होता. त्यामुळे, संस्कृत या विषयावर डॉ. रवींद्र मुळे यांनी तर अकाउंटसाठी प्रमोद गुगळे या दोन्ही सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज पोलीस उपायुक्तपदापर्यंत मी पोहोचू शकलो.
दोन शिक्षकांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेसाठी ठरले महत्त्वाचे
...तेव्हा शिक्षकांनी दिली शाबासकी
सातवीमध्ये शिक्षण घेत असताना शाळेच्या ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना वाचायला पुस्तके दिली जात नव्हती. म्हणून, शाळेत असलेल्या फटांगरे या सरांच्या नावाने मी व काही मित्र ग्रंथालयातून पुस्तके वाचायला घेत होतो. ही बाब जेव्हा फटांगरेसरांच्या लक्षात आली, त्यावेळी सर आम्हाला ओरडतील, असे वाटले होते. पण, त्यांनी मात्र वाचनाची आवड लक्षात घेऊन आम्हाला शाबासकी दिली.
मी ज्या दोन्ही शाळांमध्ये शिकलो, तेथे बहुतांश विद्यार्थी सामान्य कुटुंबातीलच होते. त्यामुळे तेथील शिक्षक सर्व मुलांना बरोबर घेऊन शिकवत असत. सगळ्या मुलांना समान न्याय दिला जायचा. मुलांच्या कलागुणांचे जसे कौतुक केले जायचे, तशी चूक झाल्यास शिक्षाही केली जायची. माझ्याकडून चुका झाल्या, त्या-त्या वेळी शिक्षकांनी दिलेली शिक्षा आणि नंतर केलेला योग्य उपदेश यामुळेच कोणत्याही चुकीच्या मार्गाला कधी गेलो नाही.
चौथीत असताना केली होती कॉपी...
चौथीत असताना मित्र संतोष याचा अभ्यास झाला नव्हता. तर, माझा अभ्यास झाला असतानासुद्धा मैत्रीखातर परीक्षेत कॉपी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, माझ्या थरथरणाºया हातावरून शिंदेबार्इंना संशय आला आणि त्यांनी घेतलेल्या झडतीत माझ्याकडे कॉपी आढळून आली. संतोषच्या सांगण्यावरून कॉपी केल्याचे मी बार्इंना सांगितले. त्यावेळी, बार्इंनी दम देऊन पुन्हा कॉपी न करण्याचे सांगून पेपर लिहिण्यास दिला असता पूर्ण गुण मिळविले. त्यानंतर, पुन्हा कधीच कॉपी केली नाही.