CoronaVirus News : ठाण्यातील लघुउद्योगांना महावितरणचा ‘लॉकडाऊन शॉक’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:36 AM2020-06-21T00:36:23+5:302020-06-21T00:36:29+5:30
एमआयडीसीनेही पाण्याची सरासरी बिले लाखांच्या घरात पाठवली आहेत. त्यामुळे कामगारांचे पगार द्यायचे की बिले भरायची, असा पेच त्यांना पडला आहे.
अजित मांडके
ठाणे : लॉकडाऊ नमुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. जूनमध्ये लॉकडाऊ न शिथिल केल्यानंतर यातून सावरताना तीन महिन्यांनंतर लघुउद्योग सुरू झाले. या कालावधीत बंद असलेल्या कंपन्यांना सरासरी २० ते २५ लाखांची बिले पाठवली आहेत. एमआयडीसीनेही पाण्याची सरासरी बिले लाखांच्या घरात पाठवली आहेत. त्यामुळे कामगारांचे पगार द्यायचे की बिले भरायची, असा पेच त्यांना पडला आहे.
एमआयडीसीतील ३,४१९ आणि एमआयडीसीच्या पट्ट्याबाहेरील ३१२६ उद्योगांना परवानगी दिली आहे. २१ मार्चनंतर जूनमध्ये यातील ५० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. तेथे २० टक्केच काम होत आहे. मात्र, त्यांना लागणारा कच्चा मालही मिळत नाही आणि बाजारातून मागणीही नाही. त्यामुळे उद्योजकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातही कामगारही येण्यास तयार नाहीत. जे येत आहेत, त्यांना खबरदारी घेऊन काम करावे लागत आहे. अत्यावश्यक सेवेत न मोडणारे उद्योग आजही बंद असल्याने साहित्य मिळत नाही. त्यामुळे जादा पैसे मोजावे लागत आहेत. वाहतूकदार एक हजाराच्या भाड्यासाठी चार ते पाच हजार रुपये आकारत आहेत. शिवाय, मार्केटमधून आॅर्डर नसल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच आता उद्योगधंदे सुरू केल्यानंतर महावितरणनेही या उद्योगांना सरासरी बिल पाठवून मोठा शॉकच दिला आहे. तीन महिन्यांत वीजवापरच झालेला नसताना महावितरणने सरासरी २० ते २५ लाखांचे बिल पाठवले आहे. ही भरमसाट बिले भरायची कशी, असा सवाल उद्योजक करत आहेत. एमआयडीसीनेही उद्योगांना पाण्याची सरासरी बिले लाखांत पाठविल्याने तोंडचे पाणी पळाले आहे.
>लघुउद्योग संघटनांची शुक्रवारी उद्योगांच्या समस्यांबाबत बैठक झाली असून या बैठकीत अत्यावश्यक सेवेबरोबर इतर सेवेतील उद्योगांनाही परवानगी द्यावी. उद्योगधंदे सुरू ठेवता येतील, तेवढा बाजारात कच्चा माल उपलब्ध करून द्यावा, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
- संदीप पारीख,
उपाध्यक्ष, चेंबर आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशन
>जूनमध्ये उद्योग सुरू केले आहेत. पण, हे बंद असल्यासारखेच आहेत. माल उचलला जात नाही. मार्केटमध्ये जे साहित्य आवश्यक आहे, ते उद्योग आजही बंद आहेत. त्यामुळे काम कसे करायचे, असा पेच आहे.
- ए.वाय. अकोलावाला, मानद सहसचिव,
ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
>महावितरणने एकेका उद्योजकाला तीन महिन्यांचे २० ते २५ लाखांचे बिल पाठवले आहे. एमआयडीसीनेही पाण्याचे सरासरी लाखांत बिले पाठविली आहेत. तीन महिने वापरच झाला नाही, तर बिले एवढी आलीच कशी?
- एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन