दोन तास झाले तरी वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वेसेवा ठप्प; सिंहगडसह इतर रेल्वे गाड्याही खोळंबल्या
By पंकज पाटील | Published: October 29, 2023 10:19 AM2023-10-29T10:19:18+5:302023-10-29T10:22:48+5:30
आज रविवारची सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले नसले तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मात्र या लोकल खोळंब्यामुळे हाल झाले.
अंबरनाथ: वांगणी आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान अप मार्गावर रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. आज रविवारची सुट्टी असल्यामुळे कामानिमित्त बाहेर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.
वांगणी ते बदलापूर ह्या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या वायरच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले तरी त्या दरम्यान कर्जत दिशेकडे एकही लोकल ट्रेन पाठवण्यात आली नाही. तर दुसरीकडे कर्जतच्या प्रवाशांना मुंबईच्या दिशेकडे जाण्यासाठी एकही लोकल उपलब्ध झाली नाही.
मुंबईहून येणाऱ्या सर्व गाड्या बदलापूर पर्यंत चालवण्यात येत आहेत. आज रविवारची सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले नसले तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मात्र या लोकल खोळंब्यामुळे हाल झाले. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनही खोळंबल्या आहेत. सिंहगड एक्स्प्रेसही ही शेलूजवळ थांबविण्यात आली आहे.