ठाणे :मुंबई महानगराची अर्थव्यवस्था ही १५० ते २०० बिलियन डॉलरपर्यंत आहे. २०३० पर्यंत अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलर, तर २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलर पर्यंत नेणार असल्याचा निर्धार नीती आयोगाचे अध्यक्ष डॉ. बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर हे मेगासिटी बनू शकत असल्याचे मतदेखील त्यांनी मांडले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सुब्रमण्यम यांचे ‘पाच ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर टीपटॉप प्लाझा येथे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की, मुंबई महानगरचा विकास करताना शाश्वत विचार केला जाणार आहे. सध्या लंडन, न्यूयॉर्क आणि टोकीओ ही तीन ग्लोबल शहरे आहेत. आज अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे. भविष्यात विकसित महाराष्ट्राची योजना बनविली जाईल. हे राज्य विकसित महाराष्ट्र असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राधिकरणांना समन्वयाने काम करावे लागेल
नीती आयोगाच्या प्रमुख अर्थव्यवस्था सल्लागार ॲना रॉय यांनी सांगितले की, मुंबई महानगरचा विकास करताना विविध प्राधिकरणांना समन्वयाने काम करावे लागेल. मुंबई महानगरातील खासगी क्षेत्रांतून १० ते ११ लाख कोटींची गुंतवणूक होऊ शकते इतकी या प्रदेशाची क्षमता आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्यकारिणी सदस्य सुजय पत्की, कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.