मुंबईतील कचरा भिवंडीकरांच्या माथी; हिरव्यागार निसर्गाला प्रदूषणाचे ग्रहण
By नितीन पंडित | Published: September 8, 2023 05:35 PM2023-09-08T17:35:56+5:302023-09-08T17:36:11+5:30
गृह प्रकल्पासमोर गावातील काही मंडळी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील कचरा टाकण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
भिवंडी : मुंबईसह ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील कचरा भिवंडीतील दिवे अंजुर गावात टाकला जात असून या कचऱ्याला आग लावल्याने होत असलेल्या धुराच्या प्रदूषणाने येथील स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.या प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक ग्राम पंचायत व पोलीस प्रशासनाबरोबरच केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदने दिली आहेत मात्र तरीही शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
भिवंडीतील निसर्गरम्य असलेल्या दिवे अंजुर व मानकोली परिसरात मोठ्या प्रमाणात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत.भिवंडी ग्रामीण भागात निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक बांधकाम व्यवसायिकांनी येथे मोठं मोठी गृह प्रकल्प बांधली आहेत.याच परिसरात अप्पर ठाणे म्हणून ओळख असलेल्या लोढा गृह प्रकल्प असून शहराच्या दाटीवाटीतून स्वतःची सुटका करून घेतलेले अनेक नागरिकांनी या गृह संकुलात मोठी किंमत देऊन घरे घेतली आहेत.मात्र याच गृह प्रकल्पासमोर गावातील काही मंडळी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील कचरा टाकण्यासाठी पुढाकार घेत आहेत.त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत.त्याचबरोबर कचरा जास्त झाली की या कचऱ्याला आग लावली जाते त्यामुळे कचऱ्याचा धूर गावाबरोबरच बाजूला असलेल्या शाळा व अप्पर ठाणे प्रकल्पात पसरल्याने येथील नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे मुंबईच्या धकाधकीच्या वातावरणातून भिवंडीतील निसर्गरम्य ठिकाणी आम्ही पैसे खर्च करून राहिला आलो आहोत.मात्र येथे काही नागरिक बाहेरचा कचरा आणून टाकत असून या कचऱ्याच्या दुर्गंधी व धुराने आम्ही हैराण झालो आहोत.याबाबत शासकीय यंत्रणेसह ग्राम पंचायत,पोलीस,प्रदूषण मंडळ व खासदारांना देखील विनंती केली आहे मात्र आमच्या या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे भविष्यात भिवंडीतील निसर्गरम्य असलेल्या ग्रामीण भागात देखील प्रदूषणाची समस्या गंभीर होणार असून आमच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशी प्रतिक्रिया लोढा अप्पर ठाणे गृहप्रकल्पातील रहिवासी संतोष नार्वेकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.